चार लाखांच्या खंडणीसाठी अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 12:47 AM2017-10-03T00:47:17+5:302017-10-03T00:47:17+5:30
एका व्यक्तीचे अपहरण करून चार लाखांची खंडणी मागणाºया चौघांना पोलिसांनी शिताफीने अटक करून अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका केली. कदीम जालना पोलिसांनी देवगाव-सेलू रोडवर ही कारवाई केली. मात्र मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : एका व्यक्तीचे अपहरण करून चार लाखांची खंडणी मागणाºया चौघांना पोलिसांनी शिताफीने अटक करून अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका केली. कदीम जालना पोलिसांनी देवगाव-सेलू रोडवर ही कारवाई केली. मात्र मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागला नाही.
अटक केलेल्या संशयितांची नावे राजू शंकर ढोणे (रा. चामणी, ता.जिंतूर) चंदू रामचंद्र बिरगड (रा. ब्रह्मवाडी, ता. सेनगाव) शुभम कल्याण शिनगारे, मनोहर गणेश ससाणे (दोघे, रा. उस्मानपुरा, औरंगाबाद) अशी आहेत.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, रमेश श्रीराम राठोड (रा. गोसावी पांगरी) यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. वडील श्रीराम राठोड यांचे रामराव सीताराम मायकर (रा.सतकर कॉम्प्लेक्स, जालना) याने चार लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचे तक्रारीत म्हटले होते. २९ सप्टेंंबरला तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रमेश राठोड यांना सोबत घेऊन तपास सुरू केला. खंडणी मागणारे रमेश राठोड यास वारंवार फोन करून पैशाची मागणी करत होते. पैसे न दिल्यास श्रीराम राठोड यांना जिवे मारून टाकू, अशी धमकी देत होते. खंडणी मागणाºयांबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कदीम जालना पोलीस रविवारी एका खाजगी वाहनातून रमेश यांना सोबत घेऊन परभणीच्या दिशेने रवाना झाले. देवगाव-सेलू रोडवर खंडणी मागणाºयांनी बोलावलेल्या जागेपासून काही अंतरावर रमेश राठोड यांना खाली उतरून पुढे जाण्यास सांगितले. रमेश खंडणी मागणाºयांच्या वाहनाजवळ पोहोचले. दबा धरून बसलेल्या पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. तर एक जण फरार झाला. पोलिसांनी श्रीराम राठोड यांची सुटका करीत अपहरणासाठी वापरलेली गाडी (एमएच ४३, व्ही.१२२८) ताब्यात घेतली. ताब्यात घेतलेल्या संशयितांची झडती घेतली असता, राजू ढोणे याच्याकडे एक पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे, चंदू बिराडकडे एक कोयता व इतर दोघांकडे काठ्या आढळल्या. या प्रकरणात सहभागी अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालासाहेब पवार, उपनिरीक्षक एस.डी. पवार, सोमनाथ लहामगे, गणेश जाधव, रमेश काळे, वाटुरे, राठोड यांनी ही कारवाई केली.