कोरोनामुळे किडनीचे नुकसान, लक्षणांकडे लक्ष द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 05:35 PM2021-06-17T17:35:52+5:302021-06-17T17:36:31+5:30

कोरोनाच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणामांमुळे किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला असून प्रोस्टेटची लक्षणे वाढत आहेत.

Kidney damage due to corona, pay attention to the symptoms! | कोरोनामुळे किडनीचे नुकसान, लक्षणांकडे लक्ष द्या !

कोरोनामुळे किडनीचे नुकसान, लक्षणांकडे लक्ष द्या !

googlenewsNext
ठळक मुद्देकिडनीवर संसर्ग, औषधांचा परिणाम जाणवतोय

- योगेश पायघन

औरंगाबाद : कोरोनासह म्युकरमायकोसिसच्या उपचारातील औषधांमुळे किडनीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिमाण होत आहे. तर कोरोना विषाणूचाही प्रत्यक्ष परिणाम होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत किडनीचे नुकसान अधिक प्रमाणात समोर येत आहे. त्यामुळे किडनी विकाराच्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी किडनी विकाराच्या नाॅन कोविड रुग्णांसाठी सुपरस्पेशालिटी ब्लाॅकमध्ये स्वतंत्र डायलिसिसची व्यवस्था करण्यात आली तर कोरोना रुग्णांसाठी मेडिसीन विभागात घाटी प्रशासनाने व्यवस्था केली. जानेवारी ते मे महिन्यादरम्यान दीड हजार रुग्णांचे डायलिसिस घाटीत झाले. त्यावरून किडनी विकाराच्या रुग्णांच्या संख्येचा अंदाज येतो. याशिवाय कोरोनानंतर अनेकांना किडनीसंदर्भात समस्या उद्भवू लागल्या आहेत. कोरोनाच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणामांमुळे किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला असून प्रोस्टेटची लक्षणे वाढत आहेत. तर रुग्णांत लघवीतील संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे लक्षणांकडे लक्ष द्या. काळजी घ्या, असे आवाहन किडनी विकार तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

किडनीचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास...
किडनी विकाराच्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्यावर उपचार सारखेच आहेत. मात्र, त्यांनी घाबरून न जाता तत्काळ उपचार घ्यावेत.
दुखणे अंगावर काढू नये. कोरोनाचे लक्षणे दिसल्यास तत्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मनाने औषधोपचार घेऊ नये.
कोरोना विषाणूचा १०० पैकी २ ते ५ रुग्णांच्या किडनीवर परिणाम दिसून आला आहे. किडनी प्रत्यारोपण झालेल्या कोरोनाबाधितांनीही कोरोनावर योग्य उपचार घेतल्याने मात केली आहे. अशास्त्रीय वैद्यकीय उपचार टाळणे महत्त्वाचे असून कोणतेही घरगुती उपचार करू नयेत.

डॉक्टरांशी बोलूनच घ्या स्टेरॉईड
किडनी विकार, प्रोस्टेटची लक्षणे वाढत आहेत. तर लघवीतील संसर्गाचे प्रमाण वाढताना रुग्णांत दिसत आहे. कोरोना, व्हायरल इन्फेक्शन, स्टेराॅईडमुळेहीही किडनीत गुंतागुंत होऊ शकते. त्यावर अद्याप रिसर्च नाही पण क्लिनिकल ऑब्झर्व्हेशनमध्ये हे दिसून येत आहे. लघवीची जागा स्वच्छ ठेवणे, कोणतीही लक्षणे दिसल्यास लघवीच्या तपासण्या करून घ्याव्यात. कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितल्या शिवाय स्टेरॉईड घेऊ नयेत, असे मूत्ररोगतज्ज्ञ डाॅ. अभय महाजन यांनी सांगितले.

औषधांचा अप्रत्यक्ष परिणाम
कोरोनात किडनीसंबंधी विकार, किडनीतील इन्फेक्शन वाढल्याचे दिसून येते. कोरोनातील रेमडेसिविर, म्युकरमायकोसिसचे ॲम्फोटेरेसीन बी या औषधांचा परिणाम अप्रत्यक्ष होऊ शकतो. तर कोरोनाचा थेट परिणाम किडनीवर होतो. त्याचे प्रमाण ३ ते ५ टक्के असून योग्य उपचाराने कोरोना बरा होतो. मात्र, कोरोनापासून बचाव करणे, लक्षणे दिसल्यास उपचार तत्काळ घेण्यावर भर देण्याची गरज आहे.
- डॉ. सचिन सोनी, किडनी विकार तज्ज्ञ.

हे करा...
- कोरोनापासून बचाव करा, प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन काटोकोरपणे करा. लक्षणांकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या.
- किडनीचा त्रास असेल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार नियमित घ्या. पण, मनाने कोणतेही औषधोपचार घेणे टाळा.
- किडनी विकार असतानाही कोरोना बरा होतो. त्यामुळे लवकर उपचार घेण्यावर भर घ्या.

हे करू नका...
- विनाकारण कोणत्याही तपासण्या किंवा गोळ्या, औषधी घेऊ नका.
- मूत्रपिंड किंवा मूत्रमार्ग विसर्गासंबंधीच्या अडचणी असल्यास डॉक्टरांना सांगा, त्याबद्दल संकोच बाळगू नका.
- घाबरून जाऊ नका, कोरोना योग्य उपचाराने बरा होतो.

कोरोनाचे एकूण रुग्ण -१,४४,९०८
बरे झालेले रुग्ण -१,४०,११४
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण -१४३८
एकूण मृत्यू -३,३५६
दुसऱ्या लाटेतील मृत्यू -२११८

Web Title: Kidney damage due to corona, pay attention to the symptoms!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.