२५ फेब्रुवारी रोजी किडनी मॅरेथॉन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:31 AM2018-01-26T00:31:31+5:302018-01-26T00:31:37+5:30
जागतिक किडनी दिनानिमित्त २५ फेब्रुवारी रोजी ‘किडनीथॉन २०१८’ या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन युनायटेड सिग्मा हॉस्पिटल, नेफ्रॉन किडनी केअर व नेफ्रॉन एक्स्चेंज ट्रान्सप्लांट प्रोग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
औरंगाबाद : जागतिक किडनी दिनानिमित्त २५ फेब्रुवारी रोजी ‘किडनीथॉन २०१८’ या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन युनायटेड सिग्मा हॉस्पिटल, नेफ्रॉन किडनी केअर व नेफ्रॉन एक्स्चेंज ट्रान्सप्लांट प्रोग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
किडनी निरोगी ठेवण्यासाठी सुदृढ जीवनशैलीचे महत्त्व जनमाणसात प्रसारित करण्यासाठी ही किडनीथॉन आयोजित करण्यात आली असल्याची माहिती किडनी विकारतज्ज्ञ डॉ. सचिन सोनी व डॉ. श्रीगणेश बरनेला यांनी दिली. सदर स्पर्धा १० कि.मी., ५ कि.मी. व २ कि.मी. या गटात होणार आहे. स्पर्धकांसोबत किडनी प्रत्यारोपण झालेले रुग्ण, किडनीदाते यांचासुद्धा सहभाग या मॅरेथॉनमध्ये राहणार आहे. मॅरेथॉनदरम्यान ‘किडनी प्रत्यारोपणाचे फायदे’ या विषयावर बॅनर स्पर्धाही घेण्यात येणार आहे.
५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी
जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन किडनी विकाराबद्दल जनजागृती करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन युनायटेड सिग्मा हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय रोटे व मुख्य संचालक डॉ. उन्मेष टाकळकर यांनी केले आहे. ‘किडनीथॉन २०१८’ ची नोंदणी ६६६.‘्रल्लिी८३ँङ्मल्ल.ूङ्मे या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नोंदणीची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी आहे. ज्येष्ठ नागरिक, बॅनर स्पर्धक व किडनी रुग्णांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.