मराठवाड्यात १६ रुग्णांवर होणार किडनी प्रत्यारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:08 AM2018-08-13T01:08:12+5:302018-08-13T01:08:40+5:30
मराठवाड्यातील जवळपास २२ रुग्णांवर किडनी प्रत्यारोपणाच्या परवानगीचे प्रस्ताव विभागीय समितीकडे आले होते. घाटी रुग्णालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत २२ पैकी १६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठवाड्यातील जवळपास २२ रुग्णांवर किडनी प्रत्यारोपणाच्या परवानगीचे प्रस्ताव विभागीय समितीकडे आले होते. घाटी रुग्णालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत २२ पैकी १६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गत दोन ते तीन वर्षांपासून अवयव दानाच्या जनजागृतीसाठी शासनासह स्वयंसेवी संस्थांकडून प्रयत्न केले जात आहेत. रॅली, प्रदर्शन, कार्यशाळा आदींच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांपर्यंत अवयव दानाची माहिती पोहोचविण्याचे कार्य केले जात
आहे.
या मोहिमेला यश येत असल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत किडनी निकामी झालेले २२ रुग्ण विविध खाजगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. या रुग्णांच्या वतीने किडनीचे प्रत्योरापण करण्याची परवानगी मागणारे अर्ज विभागीय समितीकडे सादर करण्यात आले.
या विभागीय समितीची बुधवारी बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्व प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. त्यात आवश्यक त्या कागदपत्रांच्या पडताळणीसह रुग्णांच्या इन कॅमेरा मुलाखती घेण्यात आल्या. परवानगीची सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर २२ पैकी १६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. या परवानगी दिल्यानंतर संबंधित खाजगी रुग्णालयांत रुग्णांवर किडनीचे प्रत्यारोपण केले जाणार
आहे.