मुले गुटगुटीत, पण लठ्ठ तर नाहीत ना ? लहान वयातील लठ्ठपणा ठरू शकतो धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2022 07:05 PM2022-03-05T19:05:23+5:302022-03-05T19:05:33+5:30

जागतिक स्थूलता दिन : ४० टक्के मुले लठ्ठ, मोबाईलचा सतत वापर, जंकफूड आणि मैदानी खेळ बंद झाल्याने मुलांमध्ये लठ्ठपणा वाढीला हातभार लागत आहे.

Kids are grumpy, but not obese, are they? Childhood obesity can be dangerous | मुले गुटगुटीत, पण लठ्ठ तर नाहीत ना ? लहान वयातील लठ्ठपणा ठरू शकतो धोकादायक

मुले गुटगुटीत, पण लठ्ठ तर नाहीत ना ? लहान वयातील लठ्ठपणा ठरू शकतो धोकादायक

googlenewsNext

औरंगाबाद : लहान मुलांमधील स्थूलता ही आता दिवसागणिक वाढत जाणारी गंभीर समस्या बनली आहे. शहरी भागांमधूनच नव्हे तर ग्रामीण भाग व तुलनेने गरीब कुटुंबातही आता स्थूल मुलांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. ओपीडीत येणारी ४० टक्के किशोरवयीन मुले लठ्ठ असल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञ संघटनेने नोंदविले आहे.

दरवर्षी ४ मार्च हा दिवस जागतिक स्थूलता दिन म्हणून पाळला जातो. बैठी जीवनशैली, मैदानी खेळांचा अभाव, मोबाईल इंटरनेटचे वेड, घरगुती पदार्थांविषयी कमी झालेली मुलांची आवड, पालकांची व्यस्तता या सगळ्यांमुळे दिवसेंदिवस ही समस्या अक्राळविक्राळ रूप धारण करत आहे.

काय आहे धोका ?
मुलांचे स्थूलत्व जितके जास्त वर्षे राहील तितके प्रौढ वयात स्थूल राहण्याचे प्रमाण अधिक. यावर लवकर उपाय न केल्यास प्रौढावस्थेमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वसनाचे आजार व तरुण वयातच हृदयरोग, पक्षाघात, सांध्याचे आजार, काही प्रकारचे कॅन्सर इ. आजारांचा धोका वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

स्थूलत्वाची प्रमुख कारणे 
१) अति उष्मांक सेवनामुळे येणारे स्थूलत्व २) जनुकीय दोषांमुळे येणारे स्थूलत्व. यामध्ये स्थूलतेबरोबरच मतिमंदत्व, चेहऱ्याची विशिष्ट ठेवण, सदोष जननक्षमता इ.
३) आंतरग्रंथींमधील दोष. काही विशिष्ट हार्मोन्सच्या कमतरतेमुळे (उदा. थायरॉईड हार्मोन, ग्रोथ हार्मोन) किंवा अतिप्रमाणात.
४) इतर कारणांमध्ये मेंदूच्या काही आजारानंतर येणारे स्थूलत्व, काही औषधांमुळे येणारे स्थूलत्व.

स्थूलत्व हा आजार
सर्वप्रथम स्थूलत्व हा आजार आहे, हे सर्वांनी मान्य केले पाहिजे. लठ्ठ किंवा गुटगुटीत बाळ म्हणजे सुदृढ ही संकल्पना चुकीची आहे, हे समजून घ्यायला हवे.
- डॉ. संध्या कोंडपल्ले, सचिव, औरंगाबाद बालरोगतज्ज्ञ संघटना

एकत्रित प्रयत्न व्हावा
लहान मुलांमधील वाढत चाललेल्या स्थूलत्वाकडे कौटुंबिक, सामाजिक व शासकीय अशा सर्व पातळ्यांवर एकत्रित प्रयत्न झाल्यास उद्याची पिढी आरोग्यसंपन्न, सुदृढ व उत्साही होण्याकडे आपला प्रवास सुरू होईल.
- डॉ. राजश्री रत्नपारखी, अध्यक्ष, औरंगाबाद बालरोगतज्ज्ञ संघटना

जंकफूडपासून मुलांना ठेवा दूर
मोबाईलचा सतत वापर, जंकफूड आणि मैदानी खेळ बंद झाल्याने मुलांमध्ये लठ्ठपणा वाढीला हातभार लागत आहे.
पालकांनी कोरोनाची भीती न बाळगता मुलांना खेळण्यासाठी पाठविले पाहिजे.
- डाॅ. अभय जैन, बालरोगतज्ज्ञ
 

Web Title: Kids are grumpy, but not obese, are they? Childhood obesity can be dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.