मुलांनो, निरोगी दातांसाठी चॉकलेट्स खाणे टाळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:02 AM2021-08-27T04:02:12+5:302021-08-27T04:02:12+5:30
दर आठवड्याला १०० पेक्षा अधिक मुलांना दात किडण्याचा त्रास - प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : सिडकोत राहणारा आदित्य अवघ्या ...
दर आठवड्याला १०० पेक्षा अधिक मुलांना दात किडण्याचा त्रास
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : सिडकोत राहणारा आदित्य अवघ्या पाच वर्षांचा मुलगा. त्याचे दुधाचे दात किडले. त्याला दात दुखीचा भयंकर त्रास होऊ लागला. त्यास दंत चिकित्सकांकडे नेले असता त्यांनी सल्ला दिला की, चॉकलेट किंवा गोड चिकट पदार्थ खाल्यानंतर मुलाचे दात स्वच्छ धुतले पाहिजेत, नसता दाताला कीड लागते. दुधाच्या दाताला कीड लागलेला आदित्य हा एकमेव नसून, शहरात आठवड्याला अडीच ते तीन हजार अशी लहान मुले दात किडल्याने डॉक्टरांकडे येत असतात.
लहान मुलांमध्ये दात किडण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, अजूनही पालकांमध्ये त्यासंबंधी गांर्भीय नसल्याचे दिसून येत आहे. कारण, लहान मुलांचे दुधाचे दात घासण्याची गरज नाही, ते पडणारच आहेत, असा गैरसमज पालकांत पसरला आहे. यामुळे लहान मुलांचे दात घासून देणे किंवा त्यांना दात घासण्याबद्दल शिकविण्याकडे त्यांचे दुर्लक्ष असते. चिकट पदार्थ दातांना चिकटून राहिला की, कीड लागते. १० वर्षे वयाच्या आतच मुलांचे दात किडण्याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी साखर, गूळ, चॉकलेट, कॅन्डी यासारखे अति गोड पदार्थ खाणे मुलांनी कमी केले पाहिजे किंवा हे गोड पदार्थ खाल्ल्यावर दात स्वच्छ घासले पाहिजेत, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.
चौकट......................
चॉकलेट्स खाल्ल्यानंतर दात स्वच्छ करा
१) चॉकलेट्स खाल्ल्याने दात किडत नाहीत; पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होता कामा नये.
२) चॉकलेट खाल्ल्यानंतर चिकट पदार्थ दातात अडकून बसतो. त्यास कीड लागते.
३) चॉकलेट खाल्ल्यानंतर दात घासावे व ते स्वच्छ धुवावे.
चौकट ................................
लहानपणीच दातांना कीड
१) ६ महिने ते अडीच वर्षे दरम्यानच्या बाळांना दात येत असतात. त्यास दुधाचे दात म्हणतात.
२) दुधाचे दात १२ ते १४ वर्षे वयापर्यंत टिकून असतात. त्यानंतर ते पडतात.
३) मात्र, दुधाच्या दातांची स्वच्छता न ठेवल्याने त्यांना लवकर कीड लागते.
४) ५ ते १० वर्षे वयोगटातील लहान मुलांचे दात जास्त प्रमाणात किडत असल्याची बाब समोर येत आहे.
चौकट..............................................
अशी घ्या काळजी
१) चॉकलेट खा; पण त्यानंतर दात स्वच्छ घासा.
२) शक्यतो संध्याकाळी, रात्री चॉकलेट, अन्य गोडपदार्थ खाऊ नये.
३) लहान मुलांचे दात पालकांनी स्वत: घासून द्यावे किंवा त्यांना दात घासणे शिकवावे.
चौकट.......................
दंतरोग तज्ज्ञ काय म्हणतात
स्वच्छता ठेवणे हा एकच उपाय. काही खाल्ल्यानंतर विशेषत: गोड व चिकट पदार्थ खाल्ल्यानंतर तो पदार्थ दातात अडकू नये, यासाठी दात घासणे आवश्यक आहे. दात स्वच्छ असतील तर कीड लागत नाही.
- डॉ. अभिजित चपळगावकर, दंतरोग तज्ज्ञ
---
दुधाचे दातही घासावे लागतात
दुधाचे दात हे टूथपेस्ट घेऊन टूथब्रशने घासावे लागतात. वयाच्या १४ वर्षांनंतर दुधाचे दात पडण्यास सुरुवात होते. त्या आधी कीड लागू शकते. यासाठी पालकांनी बाळांचे दात घासावे व स्वच्छ ठेवावे.
- डाॅ. शिवकुमार रंजलकर, दंतरोग तज्ज्ञ