वाचन संस्कृती रुजविणारा ‘किड्स कॉर्नर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 05:13 PM2019-05-06T17:13:04+5:302019-05-06T17:14:00+5:30
लहान मुलांना अवांतर वाचनाची आवड लावणे, हा एकमेव उद्देश
- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : आजची मुले अवांतर पुस्तके वाचत नाहीत, त्यांना वाचनाची गोडी अजिबातच नाही, अशी ओरड अनेक पालक करीत आहेत; पण मुळात बहुतांश मुलांना हल्ली पालकच वाचताना दिसत नाहीत. त्यामुळे वाचन करायचे असते, हे मुलांना कळणार तरी कसे, म्हणूनच आजच्या मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी जीवन विकास ग्रंथालयातर्फे मागील दोन वर्षांपासून ‘किड्स कॉर्नर’ सुरू करण्यात आला आहे.
‘वाचन संस्कृती जपूया, संस्कार धन वाढवूया...’ या ब्रीदवाक्यानुसार याठिकाणी काम होते. संगीता मंडलिक आणि प्रियंका डसगावकर वाचन कक्षाचे काम पाहतात. याविषयी अधिक सांगताना त्या म्हणाल्या की, दोन वर्षांपूर्वी वाचन प्रेरणा दिनापासून आम्ही या कक्षाची सुरुवात केली. लहान मुलांना अवांतर वाचनाची आवड लावणे, हा एकमेव उद्देश यामागे आहे. दररोज सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हा वाचन कक्ष सुरू असतो. यावेळी शाळकरी मुलांनी यावे आणि या कक्षात खास मुलांसाठी ठेवण्यात आलेले हवे ते पुस्तक वाचावे, असा दिनक्रम असतो; पण अनेकदा मुले पुस्तक वाचून कंटाळलेली दिसायची म्हणून मग आम्ही याला पूरक असे अनेक उपक्रम या कक्षात सुरू केले, असे मंडलिक यांनी सांगितले.
या वाचन कक्षांतर्गत मुलांना कसे आणि काय वाचावे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येते. अनेकदा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ मंडळींना, शहरातील साहित्यिकांना आमंत्रित केले जाते. बऱ्याचदा मंडलिक आणि डसगावकर या स्वत: मुलांना विविध पुस्तकांतील कथा वाचून दाखवितात. मराठीसोबतच इंग्रजी वाचनाची सवयही मुलांना लावली जाते. विविध बौद्धिक खेळांचे आयोजन केले जाते, तसेच वर्षभर दिन विशेषानुसार विविध स्पर्धा घेऊन मुलांना कथा सांगण्याची, भाषण करण्याची तसेच संवादकौशल्य विकसित करण्याची संधी दिली जाते. अनेक दा काही व्हिडिओ दाखवूनही मुलांना गोष्टी सांगितल्या जातात.
सर्व शाळकरी विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
हा उपक्रम सर्व शाळकरी विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. वाचन संस्कृती रुजविण्यासाठी पालक, शिक्षकांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. केवळ विद्यार्थ्यांना दोष देऊन उपयोग नाही. दोन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे; पण तरी अजूनही बाल कक्षात येऊन वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय नाही. सोशल मीडियाच्या भपक्यापासून मुलांना दूर न्यायचे असेल, तर अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे.
- संगीता मंडलिक