Killari Earthquake : ‘ती’ काळोखी पहाट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 07:55 PM2018-10-01T19:55:37+5:302018-10-01T19:56:30+5:30
अनंत चतुर्दशीची ती काळोखी पहाट आठवली, तर आजही अंगावर शहारे उभारतात. त्यावेळी ‘लोकमत’च्या सोलापूर युनिटचे काम चालू होते. रात्री एकच्या सुमारास मी सोलापूरहून उस्मानाबादला पोहोचलो होतो. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीचा गोंगाट २.३० च्या दरम्यान संपून थोडासा डोळा लागत नाही तोच ३.०० ते ३.३० च्या दरम्यान परिसरात कुत्र्यांचे जोरजोरात भुंकणे सुरू झाले व पाठोपाठ रडण्याचा आवाज येऊ लागला.
- विजयकुमार बेदमुथा
बिछान्यावरून उठून पाहतोय तर वातावरण कसे तरी निस्तेज जाणवू लागले होते. अशाच स्थितीत बाल्कनीतून रूममध्ये येऊन बसलो नाही तोच अचानक भूगर्भातून पश्चिमेकडून पूर्वेकडे रेल्वे धावावी, तसा ४/५ सेकंदाचा मोठा आवाज झाला आणि घराच्या भिंतीसह तावदानेही हादरली. भीतीच्या आक्रंदाने लोकांची आरडाओरड सुरू झाली. इमारती हादरताच लोक मुलाबाळांसह घर सोडून रस्त्यावर जमा होऊ लागली.
तेव्हा मोबाईल नव्हता. त्यामुळे सर्व संदेश प्रणाली टेलिफोन किंवा वायरलेसवरच अवलंबून होती. भूकंपाच्या हादऱ्यामध्ये टेलिफोन व विजेचे खांब आडवे झाल्याने वीज व दूरसंचार यंत्रणाही पूर्णपणे ठप्प झाली. त्यावेळी उस्मानाबादला अनिल पवार हे जिल्हाधिकारी तर विष्णूदेव मिश्रा जिल्हा पोलीस प्रमुख होते. पहाटे चारच्या दरम्यान मी या दोघांनाही संपर्क करून भूकंपामुळे कोठे जास्त नुकसान झाले याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांच्याकडेही काहीच माहिती नव्हती. मात्र, पहाटे ५.३० च्या दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुखांचा फोन आला की माकणीच्या तेरणा धरणावर जे वायरलेस सेट होते, तेथून माहिती मिळाली की सास्तूर व परिसरातील गावच्या गावे जमीनदोस्त झाली असून, अनेक लोक इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबून मरण पावली आहेत.
जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हाधिकारी व सर्व शासकीय यंत्रणेने तातडीने सास्तूर व परिसराकडे धाव घेतली. मीही सकाळी सहाच्या सुमारास सास्तूरकडे निघालो. माझ्यासोबत श्यामसुंदर बोरा, बाबू काजी, भन्साळी फोटोग्राफर, शीला उंबरे, कोहिनूर फोटोचे जैनोद्दीन काजी होते. आम्ही ७.३० च्या दरम्यान लोहाऱ्याला पोहोचलो. तेथून पुढे या विनाशकारी भूकंपाची कल्पना येऊ लागली होती. गावची गावे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून गेली होती. मातीच्या ढिगाऱ्याखाली माणसे व मुकी जनावरे दबून गेलेली होती. आप्तस्वकीयांचा मातीच्या ढिगाऱ्याखालून जिवंत कोणी तरी मिळेल का याचा शोध चालू होता. अनेक ठिकाणी या शोधातून प्रेतच हाती येत असल्याने रडारड पाहण्यास मिळत होती. ज्या ढिगाऱ्याजवळ माणूस दिसत नसेल अशा ठिकाणी कुत्री मुडद्यांचे लचके तोडत होती. कावळे व गिधाडांचीही लगबग वाढलेली होती.
आम्ही सास्तूर, गुबाळ, नारंगवाडी, राजेगाव, बलसूरपर्यंत सर्वत्र फिरलो. याच दरम्यान येणेगूरहून आमचे वार्ताहर देवीसिंग राजपूत, बसवराज पाटील ही मंडळी त्या परिसरातील माहिती घेऊन आली होती. त्यांच्या सांगण्यावरून हेच चित्र सर्वत्र होते. उस्मानाबादला परत येऊन संपादक राजेंद्र दर्डा यांना परिस्थिती विशद केली. त्यांच्या सूचनेनुसार श्यामसुंदर बोरा यांना सर्व फोटोज् देऊन तातडीने खास गाडी करून औरंगाबादला पाठविले. औरंगाबादच्या लोकमत कार्यालयात सर्वप्रथम फोटो व बातमी उस्मानाबादची पोहोचली होती.
दुसऱ्या दिवशी हेडलाईनमध्ये बाय नेम बातमी आली व त्यापाठोपाठ परदेशातील व्हॉइस आॅफ अमेरिका, बीबीसीसह अनेक वृत्तसंस्थांनी लोकमत कार्यालयातून माझा फोन नंबर घेऊन घटनेचा सविस्तर वृत्तांत व फोटो माझ्याकडून घेऊन माझा संदर्भ देऊन बातम्या प्रसारित केल्या. पत्रकारितेसोबतच सामाजिक जाण ठेवून तातडीने अन्नाची पाकिटे, केळी, बिस्किटस् व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लोकमततर्फे करावी, अशी विनंती राजेंद्र दर्डा यांना, तर जैन संघटनेतर्फे करण्याची विनंती शांतिलालजी मुथ्थाा यांना केली. त्यानुसार लोकमत व जैन संघटनेचे प्रमुख मदत केंद्र सास्तूर येथे सुरू झाले. दुसऱ्या दिवशी सकाळीच ‘लोकमत’ कडून मदतीचे वितरणदेखील सुरू झाले.