Killari Earthquake : जाणीव जबाबदारीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 07:45 PM2018-10-01T19:45:42+5:302018-10-01T19:46:37+5:30
प्रेतरूप झालेल्या या माणसांच्या आतील माणूस जिवंत करणे हे महाकठीण काम सर्वांवर येऊन पडले होते. एकट्या प्रशासनाला ही जबाबदारी पेलणे शक्य नव्हते. येथेही लोकमतने आपले योगदान दिले.
- चक्रधर दळवी, संपादक, लोकमत, औरंगाबाद
ती सकाळ माझ्या मनावर शिलालेखासारखी कोरली गेली आहे. ती सकाळ नव्हतीच. महाभयंकर काळरात्रीची ती सुरुवात होती. सकाळी ६.०० वाजेच्या सुमारास लोकमतच्या सुरक्षारक्षकाचा फोन आला. ‘साहेब (लोकमतचे तत्कालीन संपादक राजेंद्र दर्डा) आॅफिसला येऊन बसले आहेत अर्जंट या. भूकंप झाला आहे.’ तेव्हा आताच्यासारखी माहितीची साधने नव्हती. त्यामुळे तपशील कळायला मार्ग नव्हता. मी लोकमत अपार्टमेंटलाच राहत होतो. दोन मिनिटांत आॅफिसला पोहोचलो. थोड्या वेळातच सर्व सहकारी आॅफिसला पोहोचले. जीवित हानी किती झाली, याची माहिती घेण्याचे काम तातडीने सुरू झाले. साहेब स्वत: सूत्रे हलवित होते, चित्र भयानक आहे. हे कळायला फार वेळ लागला नाही.
रिपोर्टिंगबरोबरच प्रत्यक्ष मदत कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे याची जाणीव झाली. साहेबांनी सहकाऱ्यांची छोटीशी बैठक घेऊन स्थितीचे गांभीर्य विशद केले. लोकमतवर असलेल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. कामाची विभागणी करून दिली आणि लोकमत आपली ऐतिहासिक जबाबदारी पार पाडण्यास सज्ज झाला. ‘आॅन द स्पॉट’ माहिती मिळावी यासाठी वार्ताहरांना घटनास्थळी पाठविण्याची व्यवस्था केल्यानंतर साहेबांनी मदतकार्याच्या मोहिमेकडे मोर्चा वळविला.
२ आॅक्टोबरच्या शांतता रॅलीच्या तयारीसाठी आदल्या दिवशीच बैठक झाली होती. बैठकीला जे मान्यवर उपस्थित होते, त्या सगळ्यांना फोन करण्यात आले. मदत पाठविण्याची विनंती त्याला करण्यात आली. लोकमतच्या या पुढाकाराला उत्तम प्रतिसाद मिळाला. खाद्याची पाकिटे आणि कपडे गोळा झाले. ही सर्व मदत दुपारच्या आत चिकलठाणा लायन्स क्लबच्या ट्रकमधून भूकंपग्रस्तांसाठी रवाना झाली.
या भूकंपात सुमारे पावणेदहा हजार माणसे काही क्षणांत मेली. जिवंत राहिलेली माणसे मात्र नंतर कित्येक वर्षे रोजचे मरण मरत राहिले. मृत्यूचे तांडव बघून माणसांची मने मेली. केवळ हालतात, चालतात म्हणून त्यांना जिवंत म्हणायचे, अशी स्थिती होती. प्रेतरूप झालेल्या या माणसांच्या आतील माणूस जिवंत करणे हे महाकठीण काम सर्वांवर येऊन पडले होते. एकट्या प्रशासनाला ही जबाबदारी पेलणे शक्य नव्हते. येथेही लोकमतने आपले योगदान दिले. लोकमतचे वार्ताहर भूकंपग्रस्त भागात समर्पित भावनेने वावरत होते.
भूकंपग्रस्तांच्या प्रत्येक समस्येला वृत्तपत्रातून वाचा फोडूनच आम्ही थांबलो नाही, तर समस्या सोडविणे ज्या यंत्रणांच्या अखत्यारीत होते, त्या यंत्रणेशी थेट संपर्क साधून समस्या मार्गी लावल्या. या महान कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य मला लाभले याचा मला आनंद आहे. लोकमतच्या पुढाकाराचा आपण एक भाग होतो, ही भावना मनाला कृतकृत्य करते.