किल्लारी भूकंप, सुरतचा प्लेग आता कोरोना; स्वातंत्र्यप्राप्तीनंतर यंदा तिसऱ्यांदा भरणार नाही कर्णपुरा यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 04:20 PM2020-10-13T16:20:39+5:302020-10-13T16:23:01+5:30
Karnapura Yatra Aurangabad News : बिकानेरचे राजा कर्णसिंह हे १८३५ मध्ये शहरात वास्तव्यास आले होते. त्यांच्या नावानेच कर्णपुरा ओळखला जातो. त्यांनीच येथे देवीचे मंदिर उभारले.
औरंगाबाद : नवरात्रोत्सव व कर्णपुरा यात्रा हे समीकरण झाले आहे. संपूर्ण मराठवाड्यात प्रसिद्ध असलेली कर्णपुरा यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द केली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मागील ७३ वर्षांत यंदा यात्रा रद्द होण्याची तिसरी वेळ आहे.
बिकानेरचे राजा कर्णसिंह हे १८३५ मध्ये शहरात वास्तव्यास आले होते. त्यांच्या नावानेच कर्णपुरा ओळखला जातो. त्यांनीच येथे देवीचे मंदिर उभारले. तेव्हापासून येथे नवरात्र उत्सवात यात्रा भरविली जाते. स्वातंत्र्यापूर्वी येथे छोट्या प्रमाणात यात्रा भरत असे; पण नंतर जसजशी शहराची लोकसंख्या वाढत गेली तसतसा यात्रेचा आकार वाढत गेला. नवरात्रीत सुमारे १० ते १२ लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात.
राज्यातील व परराज्यातील ७०० विक्रेते याठिकाणी आपले स्टॉल लावत असतात. यातून कोट्यवधीची आर्थिक उलाढाल होत असते. मात्र, यंदा कोरोनामुळे कर्णपुरा यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मागील ७३ वर्षांत तिसऱ्यांदा यात्रा रद्द झाली आहे. यात ३० सप्टेंबर १९९३ मध्ये किल्लारीचा भूकंप झाला होता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात यात्रा भरविण्यात आली नव्हती. दुसऱ्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात सुरतमध्ये प्लेगची साथ आली होती. त्यावर्षीही कर्णपुरा यात्रा रद्द करण्यात आली होती, असे येथील सामाजिक कार्यकर्ते करणसिंह काकास यांनी सांगितले.
पहिल्यांदाच भाविकांना देवीचे दर्शन नाही
१९९३ व १९९४ या वर्षी यात्रा रद्द करण्यात आली होती; पण भाविकांना देवीच्या दर्शनासाठी मंदिर खुले होते. पहिल्यांदाच नवरात्र उत्सवात यंदा भाविकांसाठी मंदिर बंद राहणार आहे. तसेच यात्राही भरणार नाही. प्रशासनाच्या आदेशानुसार शनिवारी १७ ऑक्टोबर रोजी दानवे परिवारातील मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात येणार आहे.
-संतोष दानवे, पुजारी
औद्योगिक वसाहतींनी लॉकडाऊनची मरगळ झटकलीhttps://t.co/LlU8F60y3C
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) October 13, 2020