Killari Earthquake : आठवण अन् साठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 07:48 PM2018-10-01T19:48:42+5:302018-10-01T19:49:46+5:30

. पाच ते दहा मिनिटांनी पुन्हा जमीन थरथरली आणि काळजाचा थरकाप होणारा आवाज झाला. बीड शहरात त्या काळात नवीनच टीव्हीचे जाळे सुरू झाले होते. तरीही किल्लारी परिसरात भूकंप झाल्याची बातमी धडकली ती रेडिओवरूनच.

Killari Earthquake: Remembrance & memory | Killari Earthquake : आठवण अन् साठवण

Killari Earthquake : आठवण अन् साठवण

googlenewsNext

- जगदीश पिंगळे

साखरझोपेत असतानाच एकदम जमिनीला हादरे बसत भिंती थरथरल्यासारखी जाणीव झाली आणि आम्ही संपूर्ण कुटुंबीय एका अनामिक भीतीने घराबाहेर आलो. पाच ते दहा मिनिटांनी पुन्हा जमीन थरथरली आणि काळजाचा थरकाप होणारा आवाज झाला. बीड शहरात त्या काळात नवीनच टीव्हीचे जाळे सुरू झाले होते. तरीही किल्लारी परिसरात भूकंप झाल्याची बातमी धडकली ती रेडिओवरूनच. त्याकाळी ‘लोकमत’साठी सकाळी ५ वाजता उठून बातम्यांचे टपाल पार्सल नेणाऱ्या टॅक्सी चालकाजवळ द्यावे लागत असे. बसस्टॅण्डला आल्यानंतर अंबाजोगाईच्या एका टॅक्सीचालकाने अंबाजोगाईतील माडी पडल्याचा निरोप दिला. अंबाजोगाईचे आमचे घर तीन मजली चिरेबंदी आहे. मी तातडीने घरी आलो. अंबाजोगाईला जायचे; पण कसे? मित्रांची कार किल्लारीकडे निघाल्याची कुणकुण लागली. सोबत मीही निघालो.

आमचा अ‍ॅम्बेसिडरमधून प्रवास सुरू झाला. लोखंडी सावरगाव येताच समोरून अचानक त्या काळातील नगराध्यक्ष बाळू तात्या लोमटे हे भेटले आणि त्यांनी ‘माडी पडली; पण दुसऱ्याची’ असे सांगितले. त्यामुळे अंबाजोगाईऐवजी त्यांच्यासोबत किल्लारीला गेलो. साधारण ११.००-११.३० ची वेळ असेल. गावात येताच कार थांबवून फोटोग्राफर शक्तीकुमार केंडे यांनी समोरच एका ओट्यावर ठेवलेल्या, मातीने माखलेल्या प्रेताचा फोटो काढला. थोडे पुढे जाताच जयप्रकाश दगडे यांची भेट झाली. त्यांनी गावचे सरपंच डॉ. शंकरराव यांची ओळख करून दिली. सरपंच बोलण्याच्या मन:स्थितीतच नव्हते. एक फोटो काय काढता, पुढे चवडच्या चवड आहे... दु:खाने त्यांचा स्वर रडवेला झाला होता... ‘लोकमत’चे तत्कालीन प्रादेशिकप्रमुख राम अग्रवाल नांदेडवरून तातडीने जीप घेऊन किल्लारीत दाखल झाले. 

दिवसभर माहिती गोळा करून संध्याकाळी लातूरला गंजगोलाई येथील लोकमत कार्यालयातून तो सर्व वृत्तान्त एससीआर फाईलने औरंगाबादला पाठवला. लातूर शहरात लाईट गेली होती. भूकंपामुळे लोकांनी दुकाने बंद ठेवली होती. एव्हाना मुख्यमंत्री दाखल झाले होते. राम अग्रवाल यांनी आणलेल्या जीपमधून मी आणि चालक औरंगाबादकडे  निघालो. शहराच्या बाहेर पडतो न् पडतो तोच जीपचा पाटा तुटला. लातुरात एक-दोन ठिकाणच्या गॅरेजवाल्यांना हाता-पाया पडल्यानंतर एकाने तो दुरुस्त केला. 

जीपचा पाटा बसविल्याचा आनंद फार काळ राहिला नाही. रेणापूर फाटा येत असतानाच हेडलाईट डीम असल्याचे लक्षात आले. त्यामुळे गाडी लोखंडी सावरगावहून औरंगाबादकडे नेण्याऐवजी पुन्हा अंबाजोगाईत आणली, नवीन हेडलाईट लावले आणि मग सुसाट वेगात आम्ही औरंगाबादकडे निघालो. गाडी ‘लोकमत’च्या गेटजवळ येताच आश्चर्याचा धक्का बसला. तत्कालीन संपादक राजेंद्र दर्डा स्वत: फोटोची वाट पाहत उभे होते. मला पाहताच ते म्हणाले की, कॅमेरा घेऊन सरळ डार्करूममध्ये जा. फोटो डेव्हलप करण्यासाठी दिले. कॅमेऱ्यातून रोल बाहेर काढला. निगेटिव्ह डेव्हलप केली, वाळविली. तो काळ उलट्या फिल्म लावण्याचा होता. फिल्म धुणे, ट्रेमधून काढणे, त्या हिटरवर वाळविणे अन्् कात्रीने कापून पेजला लावणे, असे संपूर्ण ट्रेस झाल्यानंतर प्लेटिंग, प्रिंटिंग अशी वेगवेगळी बाळंतपणे होत असत. अखेर तासाभरानंतर पहिला ट्रायल पेपर आला. 

दुसऱ्या दिवशी प्रत्येकाची पान १ वर बायलाईन झळकली होती. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील अनेक गावांना क्षती पोहोचली होती. प्रत्येक ठिकाणच्या दु:खाला एक वेगळी लकेर होती. मी वारंवार तो पेपर वाचत होतो; पण समाधान होत नव्हते. त्याला किल्लारीच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या आठवणींची एक काजळी होती. मन काळवंडलेले होते, दु:खाची एक लकीर कायमस्वरूपी कोरली गेली होती. नातवाचे निस्तेज कलेवर घेऊन फिरणारे भावनाशून्य डोळ्याचे आजोबा मी किल्लारीत पाहिले होते. आजोबांच्या सुकलेल्या पाठीवर घोडाघोडा करून त्यांना पिकलेल्या वयात आनंद देणारा नातू त्यांच्याच हातावर निस्तेज पडलेला होता. किल्लारीतील त्या घराचे माळवद माझ्या डोळ्यांदेखत पडले. जमिनीत गाडल्या गेलेल्या कुटुंबाने नंतर अनेक दिवस माझी झोप उडवली होती. आज पंचवीस वर्षांनंतर पुन्हा ते फ्लॅशबॅक डोळ्यासमोर तरळताना आपण आताही तिथेच उभे आहोत, असे जाणवते. 

Web Title: Killari Earthquake: Remembrance & memory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.