पत्नीवर अत्याचाराचा जाब विचारणाऱ्या मित्राला संपविले; तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 12:20 PM2023-04-06T12:20:55+5:302023-04-06T12:23:05+5:30
गंगापूर तालुक्यातील सिरजगाव येथील घटना; तीन आरोपींना अटक
गंगापूर : पत्नीवर डोळा ठेवून मित्राला दारूचे व्यसन लावले. त्यानंतर त्याच्या पत्नीवर अत्याचार केला. मित्राला हे कळल्यानंतर त्याने जाब विचारताच त्याला तिघांनी मारहाण करत विहिरीत ढकलून ठार केले. ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री १०:३० वाजता गंगापूर तालुक्यातील सिरजगाव येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी रायभान काशीनाथ थोरात (वय ४३), राहुल मच्छिंद्र आघाडे (वय ३१) व अनिल विठ्ठल सिरसाठ (वय २६) या आरोपींना अटक केली.
याविषयी अधिक माहिती अशी की, सिरजगाव येथील आरोपी रायभान थोरात याने गावातील एका ४५ वर्षीय व्यक्तीच्या पत्नीवर डोळा ठेवून दोन वर्षांपूर्वी त्याच्याशी मैत्री केली. यानंतर त्याला दारूचे व्यसन लावले. रायभान त्याला दारू पाजून त्याच्या घरी जायचा व त्याच्या पत्नीला जिवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार करीत होता. पंधरा दिवसांपूर्वी सदरील बाब या व्यक्तीच्या लक्षात आली असता, त्याने पत्नीला याविषयी विचारले, तेव्हा तिने आपबीती सांगितली. याप्रकरणी रायभान यास जाब विचारला असता त्याने मित्राला मारहाण केली.
दरम्यान, शनिवारी (दि.१) रायभानसह राहुल आघाडे, अनिल शिरसाठ हे तिघे पुन्हा त्याच्या घरी आले. रात्री १०:३० वाजेच्या सुमारास या तिघांनी मिळून मित्राला पुन्हा लोखंडी पहार व काठ्यांनी मारहाण करत विहिरीत फेकून ठार केले. याबाबत कुणाला काही सांगितले, तर मारून टाकू, अशी धमकी त्याच्या पत्नी व मुलीला देत महिलेच्या कानातील व गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. धमकीला घाबरून त्यांनी कोणालाही याबाबत सांगितले नाही. आरोपींनी या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे सांगून रविवारी (दि. २) शेतात अंत्यविधी उरकून घेतला.
नातेवाइकांना सांगितली घटना
मयताची पत्नी व मुलीने भीतीपोटी कोणालाही काही सांगितले नाही. मात्र, नंतर हिमत करून मंगळवारी (दि.४) नातेवाइकांना घडलेली घटना सांगितली. इकडे गंगापूर पोलिसांना याबाबत कुणकुण लागताच उपविभागीय अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहपोनि साईनाथ गिते, पोउपनि दीपक औटे,पोहेकॉ कैलास निंभोरकर, विजय नागरे,अमित पाटील,पोअ अभिजित डहाळे, पदमकुमार जाधव,विक्रम सुंदर्डे, बलबीर बहुरे यांनी गुन्हा उघडकीस आणला व तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या. मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.