शहरातील विविध भागात अंधाराचे साम्राज्य; तब्बल ३५०० पथदिवे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 05:43 PM2019-03-01T17:43:30+5:302019-03-01T17:46:54+5:30

दिवे बंद पडत असल्याने स्थायी समिती सदस्यांनी संताप व्यक्त करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

The kingdom of darkness in various parts of the city; Close to 3500 streetlights are not working | शहरातील विविध भागात अंधाराचे साम्राज्य; तब्बल ३५०० पथदिवे बंद

शहरातील विविध भागात अंधाराचे साम्राज्य; तब्बल ३५०० पथदिवे बंद

googlenewsNext
ठळक मुद्देस्थायी समिती सदस्य संतप्त नवे ८५० एलईडी बंदकनिष्ठ अभियंतापदाची भरती रद्द करण्याची मागणी

औरंगाबाद : शहरातील विविध भागांत अंधाराचे साम्राज्य असून, तब्बल साडेतीन हजार पथदिवे बंद असल्याची माहिती गुरुवारी (दि.२८) स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली. शिवाय नव्याने बसविण्यात आलेले ८५० एलईडी दिवेही बंद असून, आठ दिवसांतच हे दिवे बंद पडत असल्याने स्थायी समिती सदस्यांनी संताप व्यक्त करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत शहरातील बंद पथदिव्यांच्या विषयांवरून सदस्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा मारा केला. सत्यभामा शिंदे यांनी वॉर्डातील बंद पथदिव्यांचे काम कोण करणार, नव्याने बसविलेले एलईडी दिवेदेखील बंद आहेत. चार दिवसांपासून फोन करीत आहे, अशी तक्रार त्यांनी केली. गजानन बारवाल, स्वाती नागरे, राखी देसरडा, ऋषिकेश खैरे, नर्गिस शेख यांनीही पथदिव्यांच्या मुद्यांवरून अधिकाऱ्यांची कोंडी केली. त्यावर उपअभियंता खमर शेख म्हणाले, कॉम्पे्रसिव्ह दुरुस्तीची मुदत ही ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपली आहे. त्यानंतर शहरातील पथदिवे बंद आणि सुरू करण्याचे काम हे एलईडीच्या कंत्राटदाराला देण्यात आले. दुरुस्तीची कामे करण्याची सूचना देण्यात आली. परंतु कंत्राटदाराने त्यास नकार दिला आहे. त्यामुळे देखभाल दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आली. परंतु त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अल्प मुदतीची नव्याने निविदा काढण्यात आली आहे. मनपाने प्रभागनिहाय देखभाल दुरुस्तीसाठी ठेकेदारांची नियुक्ती केली होती. त्यांची ६ कोटींची बिले रखडलेली आहेत. बिले मिळाल्याशिवाय कामे करणार नाही, असा पवित्रा ठेकेदारांनी घेतला आहे. 

प्रशासनाने त्यांची बिले देण्याचे आश्वासन देऊन निविदा घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे ७ मार्चपासून दुरुस्तीचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. शिल्पाराणी वाडकर यांनी अधिकृत होर्डिंगविषयी विचारणा केली. राखी देसरडा यांनी जालना रोडवर एलईडी स्क्रीनद्वारे दाखविण्यात येणाऱ्या आक्षेपार्ह जाहिरातींवर बंधन घालण्याची मागणी केली. ऋषिकेश खैरे यांनी आपल्या वॉर्डात मुख्य रस्त्यावर ५०  वॅटची फिटिंग बसविणे गरजेचे असताना ३० वॅटचे दिवे बसविण्यात आल्याचीही तक्रार केली.

‘एलईडी’च्या कंत्राटदाराला  नोटीस
एलईडी कंपनीच्या कंत्राटदाराने आतापर्यंत २३ हजार पथदिवे लावले आहेत. त्यातील ८५० पथदिवे बंद असल्याची माहिती खमर यांनी दिली. त्यावर सभापती आणि सदस्यांनी कंत्राटदारावर काय कारवाई केली, अशा प्रश्न केला. तेव्हा खमर म्हणाले, करारात कंत्राटदारावर कारवाई क रण्याची तरतूद नाही. परंतु शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी एक वर्षानंतर कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करू शकतो, असे सांगितले. त्यानुसार सभापतींनी कंत्राटदाराला नोटीस देऊन आठ दिवसांत दुरुस्ती करण्याची सूचना करावी. दुुरुस्ती न केल्यास नोटीस देण्याची सूचना वैद्य यांनी केली. 

नोकरभरती वादात
मनपाने २४ फेब्रुवारी रोजी कनिष्ठ अभियंतापदाची नोकरभरतीची प्रक्रिया राबविली. परीक्षेच्या वेळी एकाच बाकावर दोन उमेदवारांना बसविल्याने भरती चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आक्षेप गजानन बारवाल यांनी बैठकीच्या प्रारंभी घेतला. प्रश्नदेखील अभियांत्रिकीच्या दृष्टीने नव्हते. त्यामुळे भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी खुलासा करताना उपायुक्त मंजूषा मुथा यांनी परीक्षा योग्य पद्धतीने घेण्यात आल्याचे सांगितले. त्यावर बारवाल यांचे समाधान झाले नाही. त्यांनी एकाच बाकावर एकत्र बसलेल्या उमेदवारांचे मोबाईलमधील छायाचित्र सभापतींना दाखविले. त्यामुळे सभापती राजू वैद्य यांनी यासंदर्भातील सदस्यांचे म्हणणे आयुक्तांना कळविण्याची सूचना केली.

Web Title: The kingdom of darkness in various parts of the city; Close to 3500 streetlights are not working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.