7 कोटींच्या गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर रस्त्यावर अतिक्रमणांचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 01:52 PM2020-11-28T13:52:26+5:302020-11-28T13:54:45+5:30
शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम औरंगाबाद शहराला पाच रस्ते गुळगुळीत करण्यासाठी २४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता.
औरंगाबाद : गजानन महाराज मंदिर चौकापासून पुंडलिकनगर पाण्याच्या टाकीपर्यंत महापालिकेने तब्बल सात कोटी रुपये खर्च करून गुळगुळीत सिमेंट रस्ता तयार केला. या रस्त्याचा वापर फक्त आणि फक्त वाहनधारकांनी करायला हवा. मात्र, असे होताना दिसून येत नाही. व्यापाऱ्यांनी फूटपाथ तर सोडा सिमेंट रस्त्यापर्यंत अतिक्रमण केले. सिमेंट रस्त्यावर फेरीवाले आणि हात गाड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम औरंगाबाद शहराला पाच रस्ते गुळगुळीत करण्यासाठी २४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. या निधीतून पुंडलिकनगर ते गजानन महाराज मंदिर चौकापर्यंतचा २४ मीटर रुंद रस्ता तयार करण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून या भागातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. दरवर्षी डांबरी रस्ता उघडत होता. पाच वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या रस्त्याचा वापर परिसरातील नागरिकांनी करायला `हवा. दोन्ही बाजूंनी साडेसात मीटर रुंदीचा गुळगुळीत सिमेंट रस्ता तयार करण्यात आला आहे. सकाळी आणि सायंकाळी या रस्त्यावरून चारचाकी वाहन नेताना बराच त्रास होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचा नाइलाज असतो. त्यांना आपले वाहन सिमेंट रस्त्यावर उभे करावे लागते. महापालिकेने या रस्त्यावर किमान आठ ते दहा वेळेस कारवाई केली. सकाळी कारवाई झाल्यानंतर सायंकाळी अतिक्रमण जशास तसे राहते. आता तर महापालिका या समस्येकडे लक्षही द्यायला तयार नाही. वाहतूक पोलिसांनाही अनेकदा या ठिकाणी कारवाई केली. मात्र, त्याचा काहीच उपयोग होत नाही.
व्यापाऱ्यांची अतिक्रमणे दहा ते बारा फुटांपर्यंत
रस्त्यापासून बऱ्याच अंतरावर व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. व्यापाऱ्यांनी स्पर्धेसाठी दुकानासमोर आठ ते दहा फूट अंतरापर्यंत अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणांसमोर फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते आणि फेरीवाल्यांचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे अठराशे मीटर लांबीच्या रस्त्यावर वाहनधारकांना कुठे आठ फूट, तर कुठे दहा फूट जागा वाहन चालविण्यासाठी शिल्लक राहते.
पुंडलिकनगर ते गजानन महाराज मंदिर चौक
१.८ कि.मी. रस्त्याची लांबी
२४ मीटर रस्त्याची रुंदी
७ कोटी रुपये एकूण खर्च