किसान रेल्वेने ७० टन द्राक्षे बंगालमध्ये रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:07 AM2021-03-13T04:07:48+5:302021-03-13T04:07:48+5:30
नांदेड रेल्वे विभागातून मालवाहतूक वाढविण्यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी बिजनेस डेव्हलपमेंट युनिटमध्ये चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची पथकात नेमणूक ...
नांदेड रेल्वे विभागातून मालवाहतूक वाढविण्यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी बिजनेस डेव्हलपमेंट युनिटमध्ये चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची पथकात नेमणूक केली. हे अधिकारी नांदेड रेल्वे विभागातील विविध ठिकाणी भेटी देऊन मालवाहतूक वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. जी.चंद्रशेखर, ए. श्रीधर, उदयनाथ कोटला, शेख मोहम्मद अनिस यांचा या पथकात समावेश असून, डाॅ.अनिरुद्ध पमार, व्ही.रविकांत हे मालवाहतूकदार आणि व्यावसायिकांशी सतत संपर्कात आहेत. किसान रेल्वे संपूर्ण देशभर न्यू गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी, चितपूर, मालडा, अगरतला, फातुहा आदी ठिकाणी पाठविण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ऑपरेशन ग्रीन्स टॉप टू टोटलच्या अंतर्गत किसान रेल गाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर पन्नास टक्के वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इतरही शेतकऱ्यांनी या सोयींचा लाभ घेण्याचे आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी केले आहे.