किशनचंद तनवाणी म्हणजे सत्तेच्या ढेपेला लागलेला मुंगळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 12:12 PM2020-02-21T12:12:26+5:302020-02-21T12:24:22+5:30
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत कराड यांची जोरदार टीका
औरंगाबाद : भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी पुन्हा शिवसेनेत केलेला प्रवेश भाजपच्या जिव्हारी लागला असून तनवाणी म्हणजे सत्तेच्या ढेपेला लागलेल्या मुंगळ्याप्रमाणे पक्ष बदलत असल्याची टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी गुरुवारी लोकमतशी बोलताना केली. तर शहराध्यक्ष संजय केणेकर म्हणाले, तनवाणींच्या पक्ष सोडण्यामुळे भाजपऐवजी शिवसेनेवरच जास्त परिणाम होईल.
डॉ. कराड म्हणाले, तनवाणी यांना भाजपने २०१४ साली मध्य मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली. त्यात ते पराभूत झाले. त्यानंतर पक्षाने त्यांना शहराध्यक्ष केले. २०१५ साली झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या भावाला व मुलाला नगरसेवकपदाची संधी दिली. त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला. साडेचार वर्षांच्या काळात एवढे काही देऊनही त्यांनी पक्ष सोडला. सत्तेच्या मोहापायीच ते भाजपमध्ये आले होते आणि सत्तेच्या मोहापायीच ते शिवसेनेत गेल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांची कृती सत्तेच्या ढेपेला लागलेल्या मुंगळ्याप्रमाणे आहे.
शहराध्यक्ष केणेकर म्हणाले, भाजपचे सेवेचे राजकारण सोडून तनवाणी यांनी सत्तेसाठी शिवसेनेत प्रवेश केला; परंतु त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे. शिवसेना नेहमी सत्तेचे गणित करीत आली आहे. तनवाणी यांच्या व्यक्तिमत्त्वाला उंची मिळण्याची संधी भाजपमध्ये होती. त्यांना शिवसेनेत अनेकांच्या विरोधाला सामोरे जावे लागणार आहे. आमच्या पक्षातील इतर कुणीही तनवाणी यांच्यासोबत जाणार नाही. याचा भाजपऐवजी शिवसेनेवर परिणाम होईल. कारण त्यांना बºयाच जणांचा विरोध होऊ शकतो, असेही केणेकर यांनी नमूद केले.
जे त्यांच्यासोबत आले तेच जातील
तनवाणी यांच्यासोबत शिवसेनेत काही माजी नगरसेवकांपैकी पूर्व मतदारसंघातील एक किंवा दोन जण पक्षात जातील. भाजपची एखादी विद्यमान नगरसेविका जाऊ शकेल. १० ते १२ नगरसेवक तनवाणींसोबत असे बोलले जात आहे. परंतु तसे काहीही होणार नाही, असल्याने केणेकर यांनी स्पष्ट केले.