विद्यापीठाने कापला ‘पतंग’; मैदानात पतंग उडविला तर होईल गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 05:41 PM2022-12-27T17:41:39+5:302022-12-27T17:42:16+5:30

विद्यापीठातील मैदाने, क्रीडांगण, वापरण्यास मनाई 

'Kite' cut by Dr. BAMU; A case will be registered if a kite is flown in the field | विद्यापीठाने कापला ‘पतंग’; मैदानात पतंग उडविला तर होईल गुन्हा दाखल

विद्यापीठाने कापला ‘पतंग’; मैदानात पतंग उडविला तर होईल गुन्हा दाखल

googlenewsNext

औरंगाबाद : तुम्ही मकरसंक्रांतीनिमित्त विद्यापीठातील मैदानात जाऊन पतंग उडविण्याचा विचार करीत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण विद्यापीठ परिसरात पतंग उडविला अथवा त्या उद्देशाने विद्यापीठाच्या मैदानावर किंवा खुल्या जागांवर शिरकाव केला तर अशा व्यक्तीविरुद्ध तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मैदाने, क्रीडागंण, खुली जागा, खासगी व्यक्ती, संस्थांनी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. परवानगीशिवाय वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली. परिपत्रकात म्हटले आहे की, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिलेल्या आदेशानुसार विद्यापीठाच्या मैदानावर, खुल्या जागांवर व एकंदरीत विद्यापीठ परिसरात कोणीही विनापरवानगी शिरकाव करून पतंग उडवू नयेत किंवा तत्सम कारणांनी वावरू नये. या प्रकारास कायम बंदी राहील. कोणत्याही व्यक्तींनी सूचनांचे उल्लंघन केले अथवा त्या उद्देशाने विद्यापीठाच्या मैदानावर किंवा खुल्या जागांवर शिरकाव केला तर तत्काळ पोलिस ठाण्यामध्ये तक्रार करून गुन्हा नोंदविला जाईल.

...तर अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही कारवाई
सूचनांच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठ प्रशासनातील संबंधित विभागातील अधिकारी, सुरक्षा अधिकारी व त्यांचे सुरक्षा कर्मचारी यांनी विशेष काळजी घ्यावी, अन्यथा या बाबतील कोणताही गलथानपणा आढळल्यास पतंग उडविणाऱ्या व्यक्तींसह विद्यापीठात जबाबदारी असलेले संबंधित अधिकारी, सुरक्षा अधिकारी व सुरक्षा कर्मचारी यांच्याविरुद्ध नजीकच्या पोलिस ठाण्यामध्ये तक्रार करून गुन्हा नोंदविला जाईल, असेही डॉ. भगवान साखळे यांनी म्हटले.

Web Title: 'Kite' cut by Dr. BAMU; A case will be registered if a kite is flown in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.