शेळकेच्या अंगावर चाकूचे १० घाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:25 PM2019-04-16T23:25:00+5:302019-04-16T23:25:39+5:30
चहा विक्रेते दत्तात्रय शेळके यांचे स्वरक्षणासाठी प्रयत्न असफल ठरले. त्यांच्या अंगावर चाकूच्या १० खोलवर जखमा असल्याचे उत्तरीय तपासणीत स्पष्ट झाले. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पळून गेलेल्या आरोपींना त्वरित अटक करा, तरच मृतदेह ताब्यात घेऊ, अशी भूमिका घेत मृताची पत्नी कल्पना, मुलगी निकिता, मुलगा अरिहंत ऊर्फ नमन व नातेवाईकांनी मंगळवारी घाटीत ठिय्या देत आक्रोश केला.
औरंगाबाद : चहा विक्रेते दत्तात्रय शेळके यांचे स्वरक्षणासाठी प्रयत्न असफल ठरले. त्यांच्या अंगावर चाकूच्या १० खोलवर जखमा असल्याचे उत्तरीय तपासणीत स्पष्ट झाले. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पळून गेलेल्या आरोपींना त्वरित अटक करा, तरच मृतदेह ताब्यात घेऊ, अशी भूमिका घेत मृताची पत्नी कल्पना, मुलगी निकिता, मुलगा अरिहंत ऊर्फ नमन व नातेवाईकांनी मंगळवारी घाटीत ठिय्या देत आक्रोश केला. पाणी देण्याच्या क्षुल्लक कारणावरून सोमवारी रिलायन्स मॉलनजीक दत्तात्रय शेळके यांची हत्या करण्यात आली होती. त्यांचे शवविच्छेदन मंगळवारी सकाळी घाटीत करण्यात आले; परंतु आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत मृताच्या नातेवाईकांनी तेथेच सकाळपासून आंदोलन पुकारले. पोलिसांनी शिर्डीतून सोमेश बरखा रिडलॉन (२२, रा. गांधीनगर) आणि श्याम सुरेश भोजय्या (३०, रा. श्रीकृष्णनगर, शहानूरवाडी) या दोघांना अटक केल्याची माहिती दिली.
खुनातील इतरही मारेकरी सुटणार नाही, तुम्ही तपासात सहकार्य करावे, अशी समजूत सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र गायकवाड यांनी घातल्याने नातेवाईकांनी दुपारी २ वाजता मृतदेह ताब्यात घेतला.
सूत्रांनी सांगितले की, हल्ला झाला तेव्हा शेळके मदतीची याचना करीत होते; परंतु आरोपींच्या हातात चाकू असल्याने कोणी भांडण सोडविण्याची हिंमत केली नाही. हल्ला करून पळणारे आरोपी रविशंकर तायडे, आदिनाथ चव्हाण या दोघांना वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून कालच ताब्यात घेतले होते. पसार झालेल्या आरोपींनी त्यानंतर पुन्हा घटनास्थळी येथून चहा टपरी तसेच जगन्नाथ शेळके यांच्या पानटपरीची तोडफोड करून अंधारात पळ काढला. यावेळी तेथे उपस्थित राठोड यांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे जगन शेळके यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले की, पाच ते सहा आरोपी असल्याचे फिर्यादी सांगत असून, मृताच्या अंगावर चाकूच्या खोलवर जखमा आहेत. चाकूचे वार हाताने अडविल्याने दत्तात्रयच्या दोन्ही हातांवर जखमा आहेत. त्यात हाताचा अंगठादेखील छाटला गेला असून, चाकू चालविणारे सराईत गुन्हेगार असावेत, असा संशय आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पुंडलिकनगर पोलीस तपासत आहेत.