मुलांच्या पोटात जंत झाले आहेत हे सांगणाऱ्या पाच गोष्टी जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 08:16 PM2024-09-05T20:16:13+5:302024-09-05T20:16:19+5:30
मुलांच्या पोटदुखीकडे दुर्लक्ष नको; पोटात जंत झाले हे कसे ओळखायचे? उपाय काय?
छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात मुलांचे पोट दुखण्याचे प्रमाण वाढते. पोटदुखीची अनेक कारणे असू शकतात. पोटात जंत झाले तरी ते दुखते. त्यामुळे मुलांच्या पोटदुखीकडे दुर्लक्ष करता कामा नये, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला.
मुलांच्या पोटात जंत आहेत हे सांगणाऱ्या पाच गोष्टी
वारंवार पोटदुखी : मुलांना वारंवार पोटदुखीचा त्रास होणे, हे जंत झाल्याचे लक्षण असू शकते.
मळमळ, उटली, अपचन : मळमळ, उलटी, अपचन होत असेल तर जंताचा त्रास असू शकतो.
भूक न लागणे, वजन न वाढणे : मुलांना भूक लागत नसेल, वजन वाढत नसेल तर जंत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘शी-शू’च्या जागी खाज येणे : पोटात जंत असण्याचे हेही एक महत्त्वाचे लक्षण आहे.
हिमोग्लोबिन कमी होणे : मुलांचे हिमोग्लोबिन कमी होत असेल तर पोटात जंत असू शकतात.
उपाय काय?
अन्नपदार्थ खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे, उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळणे, बाथरूम स्वच्छ ठेवणे, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जंतनाशक औषध घेणे महत्त्वाचे ठरते. काही लक्षणे दिसताच वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
मुलांची काळजी घ्यावी
अस्वच्छता, विनाचप्पल उघड्यावर चालणे, हात स्वच्छ न धुणे, उघड्यावरचे पदार्थ खाणे आदींमुळे मुलांच्या पोटात जंत होऊ शकतात. त्यामुळे हे सगळे टाळले पाहिजे. मुलांमध्ये काही लक्षणे दिसताच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- डाॅ. प्रशांत चव्हाण, बालरोगतज्ज्ञ