दात्यांनी केलेल्या त्यागाची जाण ठेवून समाजासाठी काम करा: पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 12:02 IST2024-03-11T12:01:40+5:302024-03-11T12:02:04+5:30
किडनी दात्यांचा हृद्य सत्कार सोहळा, तज्ज्ञांनी दिली आरोग्याची गुरुकिल्ली

दात्यांनी केलेल्या त्यागाची जाण ठेवून समाजासाठी काम करा: पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने
छत्रपती संभाजीनगर : ‘माझी किडनी बदलली आहे...’ हे सांगणे बंद करावे. किडनी बदलल्याने आयुष्य चांगले होते, खराब होत नाही. ज्या दात्याने किडनी दिली, त्यांचा आदर म्हणून योग्य वर्तणूक ठेवावी. दात्याने स्वत:ची किडनी देऊन त्याग केलेला असतो. त्या त्यागाची जाण ठेवून समाजासाठी चांगले काम केले पाहिजे. हे आयुष्य जगण्यासाठी आई, वडील, पत्नी, भाऊ, बहिणीने किडनी देऊन जी ऊर्जा दिली आहे, ती तेवत ठेवा. इतर लोक किडनी दान करण्यासाठी पुढे येतील यासाठी प्रोत्साहन द्या, असे आवाहन पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने यांनी केले.
जागतिक किडनी दिनानिमित्त नेफ्राॅन किडनी केअरतर्फे रविवारी एपीआय काॅर्नर येथील एका लाॅनवर आयोजित किडनी दात्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मेडिसिन विभागप्रमुख डाॅ. सिद्धेश्वर बिराजदार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. व्यासपीठावर सेठ नंदलाल धूत हाॅस्पिटलचे प्रशासक डाॅ. हिमांशू गुप्ता, ओरिऑन सिटी केअर हाॅस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुनील जाधव, मुख्य व्यवस्थापकीय संचालक डाॅ. आशिष देशपांडे, कमलनयन बजाज हाॅस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. जाॅर्ज फर्नांडिस, मेडिकव्हर हाॅस्पिटलचे डाॅ. संदीप ठाकूर, डाॅ. आनंद देशमुख, प्रा. भागवत कटारे, कार्यक्रमाचे आयोजक डाॅ. श्रीगणेश बर्नेला, डाॅ. सचिन सोनी यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. किडनी दात्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला.
डाॅ. लहाने म्हणाले, किडनी दिली आहे आणि घेतली आहे, असे म्हणून दिव्यांग करू नका. एका किडनीवरही व्यक्ती सशक्त राहतो. जेव्हा आपण दुसऱ्याच्या कामाला येतो, तेव्हा तो माणूस आशीर्वाद देतो. हा आशीर्वाद विज्ञानाच्या पलीकडे जाऊन काम करतो. २९ वर्षांपूर्वी आईने मला किडनी दिली. माझा हा दुसरा जन्म ठरला. हा जन्म लोकांसाठी अर्पण केला. डाॅ. श्रीगणेश बर्नेला, डाॅ. सचिन सोनी यांनी प्रास्ताविकात सोहळ्यामागील भूमिका विशद केली.
किडनीच्या तंदुरुस्तीसाठी पेन किलर घेणे बंद करा- राजेंद्र दर्डा
किडनी खराब झाली, डायलिसिस सुरू केले, असे आपल्याला नेहमी ऐकू येते. मग येते किडनी प्रत्यारोपणाची वेळ. मात्र, किडनी सहजासहजी उपलब्ध होत नाही, असे प्रतिपादन राजेंद्र दर्डा यांनी केले. १९७१ साली भारतात पहिल्यांदा यशस्वीपणे किडनी प्रत्यारोपण झाले. त्याला ५३ वर्षे उलटून गेली आहेत. वैद्यकीय ज्ञान वाढले, तंत्रज्ञान बदलले. भारतात दरवर्षी साधारण २ लाख २० हजार रुग्णांना किडनी प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. परंतु, त्यातील थोड्याच रुग्णांना किडनी मिळते. किडनीची आवश्यकता आणि उपलब्धता, यातील तफावत दूर होण्यासाठी जनजागृती हे एकमेव उत्तर आहे. प्रत्येकाला दोन किडनी असतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार एका किडनीवरही व्यक्ती उत्तम आयुष्य जगू शकतो. याविषयी जनजागृती झाली पाहिजे. गेल्या वर्षी शहरात १४८ किडनी प्रत्यारोपण झाले. ब्रेन डेड रुग्णांच्या अवयवदानातून आतापर्यंत ७० रुग्णांना किडनी मिळाली. हे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. रक्तदाब, शुगर, वजन सांभाळले पाहिजे. नियमित व्यायाम केला पाहिजे. भरपूर पाणी प्यावे. स्वत:च्या मनाने पेन किलर घेऊ नये, असेही ते म्हणाले.