नामविस्तार झाला तसा ज्ञानाचा विस्तार व्हावा: ईश्वर नंदपुरे
By योगेश पायघन | Published: January 14, 2023 07:09 PM2023-01-14T19:09:40+5:302023-01-14T19:10:09+5:30
विद्यापीठाच्या २९ व्या नामविस्तार दिनानिमित्त व्याख्यान
औरंगाबाद : ‘समाजसुधारणेच्या धाग्यातून माणूस नावाचे वस्त्र विणता आले पाहिजे. जाती-धर्माच्या भिंती तोडण्याची ताकद केवळ शिक्षणात आहे. अक्षर वाचणाऱ्यांनी माणसे शोधली, वाचली पाहिजेत. बुद्ध बनने सोपे नसले तरी वाचनातून, चांगल्या विचाराने चित्त शुद्ध बनवता येते. नामविस्तार झाला तसा ज्ञानाचा विस्तार, समरस समाज निर्मित झाला पाहिजे. चौकटी तोडण्याचे प्रयत्न करा. कर्तबगार माणसांना वाव द्या. पुतळा बांधल्यावर त्याच्या रक्षणाची जबाबदारी पुतळा उभारणाऱ्यावर असते. तसा विद्यापीठाचा नामविस्तार ज्यांनी केला, करवून घेतला त्यांनी एकत्र येऊन हे विद्यापीठ लाखात एक करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे,’ असे मत विचारवंत, अभ्यासक डॉ. ईश्वर नंदपुरे यांनी मांडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २९ व्या नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठाच्या नाट्यगृहात शनिवारी ‘नामविस्तार एक दृष्टिकोन’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले होते. प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, संचालक डॉ. मुस्तजीब खान यांची मंचावर उपस्थिती होती. नामविस्तार लढा ही परिवर्तनाची सुरुवात असून याची जाणीव ठेवून प्रत्येकाने कार्य करावे, अशी अपेक्षा डॉ. श्याम शिरसाठ यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात कुलगुरू म्हणाले, बाबासाहेबांना अपेक्षित विद्यापीठ, संशोधन, विद्यार्थीकेंद्रित व्यवस्था करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. प्रशांत अमृतकर, डाॅ. सुरेश गायकवाड, डाॅ. गणेश मंझा आदींसह प्राध्यापक, अधिकारी उपस्थित होते. प्रा. पराग हासे यांनी संचालन केले. डॉ. मुस्तजीब खान यांनी आभार मानले.
लोकमत सुवर्ण पदकाने निवृत्ती टकले यांचा सन्मान
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बॅचलर ऑफ जर्नालिझम या विषयात २०२२ मध्ये झालेल्या परीक्षेत गुणवत्तेत सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्याला ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्यातर्फे लोकमत सुवर्ण पदक देण्यात येते. या सुवर्ण पदकाचे मानकरी निवृत्ती टकले ठरले. त्यांना कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांच्या हस्ते सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. इंग्रजी विषयात कुलपती सुवर्ण पदक, प्राचार्य एस. टी. प्रधान सुवर्ण पदक रूपाली जाधव, एम ए लोकप्रशासन विषयात डाॅ. रमेश अनंत ढोबळे सुवर्ण पदक केतकी पिसोळकर, एमए राज्यशास्त्र विषयात स्मिता कुलकर्णी, बीए इंग्रजी विषयात मानसी रोटे यांना कुलगुरूंच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.