नालंदाची ज्ञान परंपरा! बौद्ध भिक्खू संघातील अनेक भिक्खू 'पीएच.डी'धारक अन् संशोधकही
By विजय सरवदे | Published: October 24, 2023 12:24 PM2023-10-24T12:24:16+5:302023-10-24T12:25:25+5:30
समाजाला दिशा देण्यासाठी उच्चशिक्षित प्रसारकांची गरज
छत्रपती संभाजीनगर : पदवी, पदव्युत्तर पदवीच नव्हे, तर छत्रपती संभाजीनगरात ५० हून अधिक बौद्ध भिक्खू हे एम.फिल., पीएच.डी. धारण करणारे संशोधक असून ते धम्माचा प्रचार आणि प्रसार कार्यात योगदान देत आहेत. नालंदा विद्यापीठाची ही ज्ञानपरंपरा जोपासण्यासाठी यापुढेही जास्तीत जास्त भिक्खूंनी ज्ञानाची विविध क्षेत्रे पादाक्रांत करावीत आणि समाजाला दिशा देण्याचे काम करावे, अशी अपेक्षा डॉ. भदन्त खेमोधम्मो महास्थवीर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
उपसंपदा (दीक्षा) घेऊन चिवर परिधान केलेली व्यक्ती ही सामान्य माणसांपेक्षा श्रेष्ठ असते. धम्माची प्रगती आणि प्रसार करण्यास त्यांचे मोलाचे योगदान राहिलेले आहे. संघाच्या परंपरेनुसार ज्या भिक्खूंनी धम्माचा अभ्यास करून विविध देशांत बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रवाह अखंड चालू ठेवला. तो दृष्टिकोन समोर ठेवून समाजात शीलवान, नीतिवान आणि संशोधक भिक्खूंची फळी निर्माण होण्याची गरज आहे. त्यास मूर्तरूप येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये डॉ. भदन्त खेमोधम्मो महास्थवीर, डॉ. भदन्त उपगुप्त महाथेरो, डॉ. भदन्त एम. सत्यपाल, डॉ. भदन्त चंद्रबोधी, डॉ. भदन्त हर्षबोधी, डॉ. भदन्त इंदवस्स, डॉ. भदन्त शांतिदूत आदींसह जवळपास ५० पेक्षा अधिक भिक्खू पीएच.डी. झालेले आहेत, तर काहींना ही पदवी अवॉर्ड होण्याच्या मार्गावर आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धर्मांतर करून धम्मचक्र गतिमान केले. त्यामुळे समाजात आत्मबळ आले. मोठ्या प्रमाणात समाज शिक्षित झाला. अशा शिक्षित समाजाचे प्रबोधन करण्यासाठी उच्चशिक्षित भिक्खूंची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी या जिल्ह्यातील बौद्ध भिक्खू उच्चशिक्षण घेत असून त्यांना धम्माच्या विविध अंगांची ज्ञानप्राप्ती होत आहे.
समाज प्रबुद्ध बनला पाहिजे.
बुद्धवचन हे माणसाला तत्काळ प्रभावित करते. आनापान ध्यान, मैत्रीभावना आणि शिलाच्या आचरणाने संस्कारित झालेले मन क्रोध, एकमेकांप्रति हीन भावना, द्वेषाला जवळ करत नसते. मानव समाज हा प्रबुद्ध बनला पाहिजे, हा विचार रुजविण्यासाठी सुसंस्कारित भिक्खूसंघ गावोगावी जाऊन बुद्धांचे ज्ञान देत आहे. आपसात द्वेष, कपट, क्रोध या विकारांचे मुळासकट निर्मूलन करून करुणा, मैत्री वृद्धिंगत करणे हाच धम्मप्रचाराचा मुुख्य उद्देश आहे.