कोल्हापुरी बंधाऱ्यांना घरघर
By Admin | Published: June 10, 2014 12:11 AM2014-06-10T00:11:54+5:302014-06-10T00:55:05+5:30
लोहारा : सिंचन क्षमता वाढावी या उद्देशाने लोहारा तालुक्यातील १३ गावामध्ये ३३ कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आली.
लोहारा : सिंचन क्षमता वाढावी या उद्देशाने लोहारा तालुक्यातील १३ गावामध्ये ३३ कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आली. पण त्यावेळी बंधाऱ्याचे झालेले निकृष्ट काम, गायब झालेले गेट, दुरुस्तीसाठी निधी नसलेला निधी त्यामुळे कोल्हापुरी बंधाऱ्याला घरघर लागली असून, निर्मितीचा उद्देशही पाण्यात गेल्याचे दिसत आहे़
लोहारा शहराच्या शिवारात ६, जेवळी ११, धानुरी, आष्टाकासार, तोरंबा, कास्ती (खुर्द) व अचलेर या गावात प्रत्येकी २ तर सास्तूर, माकणी, तावशीगड, हिप्परगा (रवा), कानेगाव, सालेगाव शिवारात प्रत्येकी १ असे एकूण तालुक्यात ३३ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधण्यात आलेले आहेत. यातील २८ बंधाऱ्याची कामे जि.प. कडून करण्यात आली आहेत. ३३ बंधाऱ्यासाठी १०५९ गेट बसविण्यात होती़ यामधील २६१ गेट गायब असल्याची तक्रार सरकारी दप्तरात आहे. पण प्रत्यक्षात मात्र जास्त गेट गायब आहेत. त्यात जेवळी परिसरात गेट चोरुन नेताना शेतकऱ्यांनीच एका चोरट्याला पकडल्याची घटना आहे. या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी शासनाने गेले अनेक वर्षांपासून एक रुपयाची तरतूद केलेली नाही. त्यामुळे संबंधित विभाग मात्र त्या-त्या गावातील ग्रा.पं. व शेतकऱ्यांच्या सहभागातून असलेली गेट बसविले जातात.
या ३३ कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे परिसरातील २९०१.२३ दलघमी पाणीसाठा उपलब्ध होवून त्यातून ९६६ हेक्टर जमीन ओलिताखाली येणे अपेक्षित होते. पण लाखो रुपये खर्च होवून बंधारे बांधण्याचा उद्देश मात्र सफल झाल्याचे दिसून येत नाही. यावर्षी ३३ कोल्हापुरी बंधाऱ्यापैकी पाच बंधाऱ्यासाठी गेट उपलब्ध झाले. पण गेट बसवणे हे लोकसभागातूनच होणार आहे. शासन विविध योजनाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करते. पण प्रत्यक्षात मात्र ज्याचा उपयोग शेतीसाठी होतो. त्यावर खर्च करण्यास मात्र कुचराईपणा केला जातो. यावरुनच हे स्पष्ट होते. (वार्ताहर)
बंधाऱ्याची दुरूस्ती गरजेची
शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कोल्हापुरी बंधारे उभारण्यात आले आहेत़ मात्र, अनेक बंधाऱ्यांची दुरवस्था झाली असून, शेतकऱ्यांना याचा लाभ होत नाही़ त्यामुळे नादुरूस्त बंधारे दुरूस्त करून गेट बसवणे गरजेचे आहे़ त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल़ शिवाय आर्थिक उत्पन्नतही भर पडेल, असे शेतकरी सूर्यकांत बिराजदार यांनी सांगितले.
लोकसहभागावर भर
कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी गत अनेक वर्षापासून निधीची मागणी करीत आहोत़ पण निधी मिळत नाही. यावर्षी ३३ पैकी पाच बंधाऱ्याला नवीन गेट आले आहेत. दरवर्षीप्रमाणे आम्ही याहीवर्षी लोकसहभागातून सर्वच बंधाऱ्यावर गेट बसणार आहेत, असे लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता ई.टी. सूर्यवंशी यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनीच निगराणी ठेवावी
कोल्हापुरी बंधारे हे शासनाची मालमत्ता नसून ती आपलीच मालमत्ता आहे, असे समजून परिसरातील शेतकऱ्यांनी बंधाऱ्याची निगराणी केली पाहिजे. जेणे करुन गेट चोरीचे प्रमाण कमी होईल व गेट बसविल्यानंतर याचा फायदा आपल्याला होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनीच आता पुढे येण्याची गरज आहे. असे सास्तूर येथील शेतकरी किसन पवार यांनी सांगितले.