कोंडावार यांची हत्या; आरोपीला जन्मठेप

By Admin | Published: May 20, 2014 01:18 AM2014-05-20T01:18:34+5:302014-05-20T01:32:32+5:30

औरंगाबाद : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) लेखाधिकारी धर्माजी कोंडावार यांची कार्यालयात जाऊन गोळी घालून भरदिवसा हत्या

Kondawar assassination; The accused sentenced to life imprisonment | कोंडावार यांची हत्या; आरोपीला जन्मठेप

कोंडावार यांची हत्या; आरोपीला जन्मठेप

googlenewsNext

औरंगाबाद : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) लेखाधिकारी धर्माजी कोंडावार यांची कार्यालयात जाऊन गोळी घालून भरदिवसा हत्या केल्याप्रकरणी आरोपी सचिन तायडे यास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या घटनेत आरोपी तायडेला मदत करणारा त्याचा मित्र सचिन सुरेश पवार (रा. सिडको एन-७) यास पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. संपूर्ण राज्यात खळबळ उडून देणारी ही घटना ३० मे २००९ रोजी दुपारी रेल्वेस्टेशन रोडवरील आरटीओ कार्यालयात घडली होती. आरोपी सचिन तायडे याचे वडील परिवहन विभागातच नोकरीला होते. अंबाजोगाई येथील आरटीओ कार्यालयात कार्यरत असताना त्यांनी अपहार केल्याचा ठपका ठेवून २००८ मध्ये त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यावेळी धर्माजी कोंडावार हे अंबाजोगाई येथील कार्यालयात लेखाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अहवालानुसारच ही कारवाई करण्यात आली होती. कोंडावार यांची बदली औरंगाबादेतील आरटीओ कार्यालयात झाली होती. आरोपी सचिन तायडेचे औरंगाबादेत घर आहे. आपल्या वडिलांचे निलंबन मागे घ्यावे, यासाठी तायडे याने अनेकदा कोंडावार यांची भेट घेतली होती. त्यांच्याकडून मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने तायडे संतप्त झाला होता. आपल्या वडिलांच्या निलंबनास कोंडावारच जबाबदार असल्याचा तायडेचा समज झाला होता. ३० मे रोजी दुपारी कोंडावार हे उपप्रादेशिक अधिकारी अशोक गिरी यांच्या केबिनमध्ये बसलेले असताना तायडे हा गावठी पिस्तूल घेऊन तेथे गेला. यावेळी त्याने गावठी पिस्तुलातून कोंडावर यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर त्याने पिस्तूल गिरी यांच्या दिशेने रोखले आणि गोळी झाडली. मात्र, ती गोळी पिस्तुलातच अडकली. यावेळी तेथे बसलेल्या अन्य लोकांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना धक्का देऊन तो तेथून पळून गेला. यावेळी आरटीओ कार्यालयाबाहेर थांबलेल्या सचिन पवारच्या मोटारसायकलवर बसून तो तेथून फरार झाला होता. या घटनेनंतर गिरी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी तातडीने कोंडावार यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपींविरोधात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे आणि भारतीय हत्यार कायदा आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक दौलत मोरे यांनी चार दिवसांनंतर आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एस. सावंत यांच्या समोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी तायडेला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच आरोपी सचिन पवार यास पुरावा नष्ट केल्याच्या आरोपाखाली ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. मंगेश जाधव, अ‍ॅड. विनोद कोटेच्या यांनी बाजू मांडली. याप्रसंगी पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक अमोल सातोदकर यांनी काम पाहिले. आरटीओ गिरी यांची साक्ष महत्त्वाची लेखाधिकारी धर्माजी कोंडावार यांची हत्या तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक गिरी यांच्या समोर झाली होती. आरोपी तायडेने त्यांच्यावरही पिस्तूल रोखले होते. मात्र, सुदैवाने त्याने झाडलेली दुसरी गोळी पिस्तूलमध्येच अडकल्याने गिरी हेसुद्धा बालंबाल बचावले होते. या थरार घटनेचे ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. त्यांची साक्ष या खटल्यात अत्यंत महत्त्वाची ठरली. अधिकार्‍यांवरील आरोप चुकीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दौलत मोरे या प्रकरणात तपास अधिकारी होते. ते आरोपी तायडेचे नातेवाईक होते. घटनेनंतर चार दिवस आरोपी फरार होता. नातेवाईक असल्याने मोरे त्यास अटक करीत नसल्याचा आरोप त्यावेळी झाला होता. मात्र, मोरे यांनी या आरोपाकडे दुर्लक्ष करीत त्यास पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानातून अटक करून आणले होते. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक गोरख चव्हाण, सतीश जाधव यांचे त्यांना सहकार्य लाभले. मोरे यांनी उत्कृष्ट तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केल्यानेच आरोपीला शिक्षा मिळाली, हे विशेष.

Web Title: Kondawar assassination; The accused sentenced to life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.