कोरडेवाडीच्या चालकाचा मृत्यू प्रकरण वेगळ्या वळणावर !
By Admin | Published: March 2, 2016 10:56 PM2016-03-02T22:56:13+5:302016-03-02T23:09:04+5:30
बीड / विडा : इंधन वाहतूक करणाऱ्या कोरडेवाडी (ता. केज) येथील एका टँकरचालकाचा मृतदेह आत्महत्या केलेल्या अवस्थेत बुधवारी उस्मानाबाद जिल्ह्यात आढळून आला.
बीड / विडा : इंधन वाहतूक करणाऱ्या कोरडेवाडी (ता. केज) येथील एका टँकरचालकाचा मृतदेह आत्महत्या केलेल्या अवस्थेत बुधवारी उस्मानाबाद जिल्ह्यात आढळून आला. मयत चालकाचा क्लिनर मुलगा त्यांच्यासोबत होता. तो फरार असल्याने घटनेचा गुंता वाढला आहे. दरम्यान, मुलीने ‘माझे वडील आत्महत्या करु शकत नाहीत’ असा दावा करुन घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
संतराम बाळूदेव वरपे (वय ५२) असे मयत चालकाचे नाव आहे. पत्नी, दोन मुले, चार मुली, नातवंडे असा त्यांचा भरला संसार. इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरवर ते चालक म्हणून काम करायचे. परळीत ते पत्नी, मोठा मुलगा व सुनेसोबत राहत होते. त्यांचा मुलगा हनुमंत हा त्यांच्यासोबतच क्लिनर म्हणून आहे. सोलापूरहून परळीला इंधन आणायचे हा त्यांचा दिनक्रम!
सोमवारी रात्री सोलापूरहून परळीला जाण्यासाठी ते मुलासोबत निघाले. मात्र, परळीत पोहोचण्यापूर्वी काय घडले? त्याचे गूढ कायम आहे. तुळजापूरजवळ त्यांच्या टँकरला अपघात झाला, स्वत:च्या अंगातील शर्टने गळफास घेतलेल्या अवस्थेतील त्यांचा मृतदेह येडशी (जि. उस्मानाबाद) शिवारातील एका झाडाला लटकलेला आढळून आला. त्यामुळे संतराम यांच्यासोबत नेमके काय झाले? याचा उलगडा होत नाही.
येडशी पोलिसांनी पंचनामा करुन संतराम यांचा मृतदेह त्यांचा भाऊ, पुतण्याच्या ताब्यात दिला. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. लहान मुलगा श्रीराम याने भडाग्नि दिला.
दरम्यान, या घटनेपासून मयत संतराम यांचा मुलगा हनुमंत हा गायब आहे. तो त्यांच्यासोबत क्लिनर म्हणून होता. त्यामुळे वडिलाच्या मृत्यूमागचा ‘क्ल्यू’ त्याच्याकडे आहे.
मात्र, तो ना नातेवाईकांना भेटला ना पोलिसांना! वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही तो उपस्थित नसल्याने संशयाची सुई त्याच्या दिशेने जात आहे. (प्रतिनिधी)