पोलीस ठाण्यापेक्षा कोंडवाडा बरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:30 AM2018-09-19T00:30:45+5:302018-09-19T10:53:15+5:30
गुन्हेगारी परिसर म्हणून ओळख असलेल्या पेठबीड पोलीस ठाण्याच्या इमारतीची सध्या दुरवस्था झाली आहे.
- सोमनाथ खताळ
बीड : गुन्हेगारी परिसर म्हणून ओळख असलेल्या पेठबीड पोलीस ठाण्याच्या इमारतीची सध्या दुरवस्था झाली आहे. तब्बल २४ वर्षांपासून ठाण्याचा कारभार पडक्या इमारतीतून चालत आहे. तर येथील अधिकारी, कर्मचाºयांना कसल्याच सुविधा मिळत नसल्याने त्यांचे मानसिकता खचत असून संताप व्यक्त होत आहे. सोमवारी ‘लोकमत’ने स्पॉट पंचनामा केला असता येथील ‘ठाण्यापेक्षा कोंडवाडा बरा’, अशीच परिस्थिती दिसून आली. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ च्या अनुपालनासाठी या अवस्थेतून ठाण्याला मुक्ती कधी मिळणार असा सवाल केला जात आहे.
नगर पालिकेच्या मालकीच्या इमारतीत १९९३ साली पोलीस ठाणे सुरू झाले. पूर्वी येथे शाळा होती, असे सांगण्यात आले. सध्या ही इमारत धोकादायक बनली आहे. भिंती पडल्या असून, पत्रेही तुटले आहेत. खिडक्या, दरवाजे मोडले आहेत. फरशा नसल्याने सर्वत्र माती आहे. अशा ठिकाणीच येथील अधिकारी, कर्मचा-यांना कामकाज करण्याची वेळ आलेली आहे. अशा वातावरणात काम करताना अधिकारी, कर्मचा-यांची मानसिकता बिघडत आहे. त्यामुळे येथे येणा-या नागरिकांवर चिडचिड झाल्याचे प्रकार पहावयास मिळतात. येथील कारभार चांगला असला तरी इमारत व इतर समस्या गंभीर असल्याने याकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलत चालला आहे. आहे ते ठाणे सुसज्ज करावे, अन्यथा इतरत्र जागा उपलब्ध करून नवीन ठाणे तयार करावे, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.
ठाणे अन् घरांचीही तीच परिस्थिती
जनतेच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस बंदोबस्तासाठी रस्त्यावर उभा असणा-या पोलिसांनाच आज असुविधांचा सामना करावा लागत आहे.
अनेकांना राहण्यासाठी योग्य घरे नाहीत तर कामे करण्यासाठी ठाण्याला इमारती नाहीत. हाच धागा पकडून बीडमधील पेठबीड पोलीस ठाण्याची सोमवारी पाहणी केली. या पाहणीमध्ये अनेक समस्या आढळून आल्या. त्यावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकत परिस्थिती मांडली आहे.
गृह विभागाचे दुर्लक्ष
पोलीस अधिकारी, कर्मचा-यांच्या निवासस्थानाच्या प्रश्नांसह जिल्ह्यातील दुरवस्था झालेल्या ठाण्यांच्या इमारतीसाठी लोकमतने वारंवार आवाज उठविलेला आहे. सर्व समस्या समजावून घेत त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणल्या. परंतु गृह विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचा फटका पोलिसांना सहन करावा लागत असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लोकप्रतिनिधींकडूनही कानाडोळा
कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून काळजी घेणाºयांच्या प्रश्नांकडे खासदार, आमदारांसह इतर लोकप्रतिनिधींकडून कानाडोळा होत आहे. त्यांच्या दुर्लक्षामुळेच आज जिल्ह्यातील ठाण्यांच्या इमारतींची दुरवस्था झाल्याचे दिसते. आता तरी लोकप्रतिनिधिंनी आवाज उठवून पोलीस अधिकारी, कर्मचा-यांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी होत आहे.
पेठबीड हद्दीत सर्वाधिक गुन्हेगारी
इतर पोलीस ठाण्यांच्या तुलनेत पेठबीड पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात आहे. हद्दपार, एमपीडीए, चोरटे, लुटारू, गुटखा माफिया, रॉकेल माफिया यासारखे गुन्हेगार याच भागात आहेत. तसेच या भागात नेहमीच विविध कारणांवरून जास्त वाद होतात. त्यामुळे तक्रारदारांची ठाण्यात नियमित वर्दळ असते. सर्वाधिक गुन्हेगारी असलेल्या या ठाण्यालाच हक्काची आणि सुसज्ज इमारत नसल्याने अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
दोन महिन्यांपूर्वीच नव्या इमारतीचा प्रस्ताव पाठविला
बार्शी नाका परिसरातील तेलगाव रोडवर पेठबीड ठाण्यासाठी दोन एकर जागेत नवीन इमारत प्रस्तावित करण्यात आली आहे.
यासंदर्भात दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठांकडे प्रस्तावही पाठविल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
परंतु काही लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे ठाणे दूर अंतरावर जाणार आहे. या ठिकाणी नवीन इमारत उभारावी.
वास्तविक पाहता या वादामुळेच या ठाण्याला हक्काची इमारत मिळत नसल्याचे सांगण्यात येते.