कोठरबनच्या सप्ताहात नेत्यांची मांदियाळी
By Admin | Published: April 25, 2016 11:06 PM2016-04-25T23:06:11+5:302016-04-25T23:37:23+5:30
वडवणी : तालुक्यातील कोठरबन येथे श्री क्षेत्र भगवानगडाचा नारळी सप्ताह सुरू असून, सोमवारी या सप्ताहाला विविध नेत्यांनी हजेरी लावली. त्यामुळे गावात नेत्यांची मांदियाळी पाहावयास मिळाली.
वडवणी : तालुक्यातील कोठरबन येथे श्री क्षेत्र भगवानगडाचा नारळी सप्ताह सुरू असून, सोमवारी या सप्ताहाला विविध नेत्यांनी हजेरी लावली. त्यामुळे गावात नेत्यांची मांदियाळी पाहावयास मिळाली.
गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी नारळी सप्ताहाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांना प्रवेश नाही, असा इशारा दिला होता. सप्ताह कार्यक्रमास येण्यास विरोध नव्हता. त्यामुळे नेतेमंडळींची मोठी अडचण झाली होती. सोमवारी गावकऱ्यांनी सर्वच लोकप्रतिनिधींना सप्ताहाला येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार दुपारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कोठरबनमध्ये हजेरी लावली. यावेळी माजी मंत्री प्रकाश सोळंके, जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, सभापती महेंद्र गर्जे, अजय मुंडे, दिनेश मस्के आदी उपस्थित होते.
यावेळी मुंडे यांचा सत्कार झाला. त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. सामान्य माणसासाठी आपला संघर्ष असून, समाजाने साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. धार्मिक कार्यक्रमात राजकीय बोलायचे नसते, ती मला शिकवण आहे, असा टोला लगावण्याची संधी त्यांनी सोडली नाही.
पालकमंत्र्यांचीही भेट
धनंजय मुंडे यांनी कोठरबन सोडताच सायंकाळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा तेथे धडकला. त्यांनी राहुटीवर जाऊन महंत नामदेवशास्त्री यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी गावकऱ्यांचा सत्कार स्वीकारला. सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या, भगवानबाबा व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आशीर्वादावर मी जनतेसाठी राजकारणात आहे. जनतेने दिलेले प्रेम कदापि विसरता येणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांच्यासमवेत आ. आर. टी. देशमुख, माजी आ. केशव आंधळे, राजाभाऊ मुंडे, रमेश आडसकर, संतोष हंगे, बाबरी मुंडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)