जरंडीचे कोविड केंद्र दोन दिवसांत ५० टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:04 AM2021-03-22T04:04:51+5:302021-03-22T04:04:51+5:30
सोयगाव : तालुक्यासाठी एकमेव असलेले जरंडीचे कोविड केअर केंद्र अवघ्या दोन दिवसांत ५० टक्के भरले आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाबरोबर ...
सोयगाव : तालुक्यासाठी एकमेव असलेले जरंडीचे कोविड केअर केंद्र अवघ्या दोन दिवसांत ५० टक्के भरले आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाबरोबर महसूल प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे; तर निंबायत येथील तात्पुरते कोविड केंद्र सुरू करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. ५० खाटांची क्षमता असलेल्या जरंडीच्या कोविड केंद्रात रविवारी २५ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून एकूण बाधितांची संख्या ३५ वर पोहोचली आहे.
तालुक्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढतच चालला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेतदेखील वाढ होऊ लागली आहे. निंबायती मदरसामधील पर्यायी कोविड केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त झाले आहेत. जरंडी कोविड केंद्रात ऑक्सिजन सिलिंडर सोडून अन्य सुविधा तातडीने उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तीन समुदाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. तालुका आरोग्याधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे यांच्यावर संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. एकीकडे कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार आणि दुसरीकडे लसीकरण या दोन्ही कामांचा भार तालुका आरोग्य विभागावर पडला असून, अन्य यंत्रणा मदतीसाठी गरजेची आहे.
महसूल-पंचायत समिती विभाग झोपेतच
सोयगाव तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मात्र, महसूल आणि पंचायत समितीची यंत्रणा अद्यापही कुंभकर्णी झोपेत आहे. जरंडी कोविड केंद्राला या यंत्रणांनी भेटी दिलेल्या नाहीत. आरोग्य विभागाचे कर्मचारीच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी युद्धपातळीवर काम करीत आहेत.
कोविड केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त नाही
जरंडीच्या कोविड केंद्रात रुग्णभरतीची संख्या वाढली. या २५ रुग्णांच्या सुरक्षेची हमी घेण्यासाठी मात्र कोविड केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला नाही. जरंडी कोविड केंद्राचा कारभार सुरक्षेविनाच सुरू आहे.
----------
फोटो : जरंडीचे कोविड केंद्र