गंगापुरातील कोविड केंद्र फुल, आरोग्य यंत्रणा कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:04 AM2021-04-18T04:04:51+5:302021-04-18T04:04:51+5:30
गंगापूर : औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूरमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले. मृत्यूच्या बाबतीतदेखील तालुका दुसऱ्या क्रमांकावर आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून ...
गंगापूर : औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूरमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले. मृत्यूच्या बाबतीतदेखील तालुका दुसऱ्या क्रमांकावर आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून शनिवारी (दि १७) एकाच दिवशी १५४ रुग्णांची भर पडल्याने शहरातील कोविड केंद्र फुल झाली आहेत, तर मान्यता असलेले कोविड सेंटर मिळत नसल्याने रुग्णांची फरपट होऊ लागली आहे. आरोग्य यंत्रणा कोलमडली असून तहसील प्रशासनाकडून नवीन इमारत ताब्यात घेऊन सुविधा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून, आतापर्यंत सापडलेल्या ४६१३ रुग्णांपैकी ८८ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांच्या चाचण्यांचा अहवाल शनिवारी आल्याने एकाच दिवशी १५४ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. यामध्ये सि. वाडगाव व लासूर स्टेशन या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनुक्रमे ३७ व ३६, तर ग्रामीणमध्ये कणकोरी गावात एकाच दिवशी सर्वाधिक १७ रुग्ण सापडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील तीन कोविड केंद्रामध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण झाले आहेत. देवगिरी ग्लोबलची ४५, आयटीआय २८, तर शासकीय रुग्णालयाची रुग्ण क्षमता ५० असताना येथे अनुक्रमे ४८, ३० व ६० रुग्ण झाल्याने नवीन येणाऱ्या रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेला कसरत करावी लागत आहे. यापूर्वी ताब्यात असताना लाइट बिल व इतर नुकसानभरपाई न मिळाल्याने मान्यता असलेल्या ६० रुग्ण क्षमतेच्या मशिप्रमंच्या न्यू हायस्कूल कोविड केंद्राचा तहसील प्रशासनाला ताबा मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत. याबाबत तालुका आरोग्य यंत्रणेकडून तहसील प्रशासनामार्फत हे कोविड केंद्र ताब्यात घेण्याची मागणी करण्यात आली. तरीदेखील ताबा मिळत नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे. मशिप्रमं व तहसील प्रशासनामधील ओढाताणीचा रुग्णांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. या केंद्राचा ताबा मिळत नसेल तर दुसरी इमारत ताब्यात घेऊन तात्काळ कोविड केंद्र सुरू करावे, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे.