क्रांती चौक पोस्ट ऑफिस ढूँढते रह जाओगे...; ४० वर्षानंतर स्थलांतर, तेही तात्पुरते
By प्रशांत तेलवाडकर | Published: February 1, 2024 06:42 PM2024-02-01T18:42:17+5:302024-02-01T18:42:42+5:30
क्रांती चौक पोस्ट ऑफिस मागील ४० वर्ष जालना रोडवरील कुशलनगरात एका बंगल्यात खालील बाजूस होते.
छत्रपती संभाजीनगर : सिडकोनंतर सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहराचा अर्धा दक्षिण भाग क्रांती चौक पोस्ट ऑफिसच्या अंतर्गत येतो. ४० वर्षांनंतर या पोस्ट ऑफिसला कोणी ‘जागा देत का जागा’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे... जालना रोडवरील जागा खाली करावी लागल्याने आता हे ऑफिस आता थेट बसस्टँड रोडवर गेले आहे... पोस्ट ऑफिसचा शोध घेताना नागरिकांना दमछाक होत आहे. त्यामुळे थट्टेमध्ये नागरिक म्हणत आहेत ‘क्रांती चौक पोस्ट ऑफिस ढूँढते रह जाओगे’...
४० वर्षांनंतर दुसऱ्या जागेचा शोध...
क्रांती चौक पोस्ट ऑफिस मागील ४० वर्ष जालना रोडवरील कुशलनगरात एका बंगल्यात खालील बाजूस होते. ही भाड्याची जागा होती. मालकाने दिलेला नोटीस पिरीयड संपला आणि अखेर पोस्ट ऑफिसलाही जागा खाली करावी लागली. विशेष म्हणजे नोटीस पिरीयड काळात दुसरी जागा शोधण्यात अपयश आले. अखेरीस क्रांती चौक पोस्ट ऑफिस मध्यवर्ती बसस्थानक रोडवरील एम्प्लाॅयमेंटच्या समोरील बाजूस भाग्यनगरात पोस्ट ॲण्ड टेलिग्राफ काॅलनीत टू बीएचके जागेत स्थलांतर करावे लागले.
या पोस्ट ऑफिसच्याअंतर्गत शहराचा किती भाग
क्रांती चौक पोस्ट ऑफिसचा अंतर्गत महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप) ची दक्षिण बाजू ‘आरोग्य संचालनालय’ ते रेल्वे स्टेशन. महावीर चौक ते सेव्हन हिल चौक, सेव्हन हिल चौक ते चाणक्यपुरी. शहानुरमियाँ दर्गा ते रेल्वे स्टेशन एवढा मोठा परिसर येतो. सिडको पोस्ट ऑफिसनंतर सर्वांत मोठा भाग याच पोस्ट ऑफिसशी जोडला गेला आहे. २० पोस्टमन येथे सेवा देत आहे.
पोस्टाचे बजेटमध्ये जागा मिळेना
पोस्ट ऑफिससाठी केंद्र सरकारने भाड्याचे दर ठरवून दिलेले आहे. कुशलनगरमध्ये १७ हजार रुपये भाडे दिले जात होते. मात्र, आता या भाड्यात पोस्टाला जागा मिळत नाही. यामुळे ‘कोणी जागा देत का जागा’ म्हणण्याची वेळ पोस्टावर आली आहे.
कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे लोकांचा संताप
कुशलनगरपासून २ कि. मी. अंतरावर भाग्यनगरात पोस्ट ऑफिस स्थलांतरीत झाले आहे तसेच भाग्यनगरात हे ऑफिस शोधताना लोकांची दमछाक होत आहे. त्यामुळे नागरिक आपला संताप कर्मचाऱ्यांवर व्यक्त करत आहेत.
नवीन जागा मिळेपर्यंत तात्पुरती व्यवस्था
क्रांती चौक पोस्ट ऑफिस स्थलांतरित करण्यात आले आहे. पण ही तात्पुरती व्यवस्था आहे. आम्हाला ४ ठिकाणच्या जागेचे प्रस्ताव आले आहेत. तो प्रस्ताव क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठविला आहे. तिथून तो मुख्य पोस्ट मास्तर जनरल (मुंबई) या ऑफिसला जाईल. तिथील समिती जागा बघण्यासाठी शहरात येईल व केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्या बजेटमध्ये बसेल त्याठिकाणी भाडे करारावर ऑफिस स्थलांतरीत करण्यात येईल.
-जी.हरिप्रसाद, प्रवर डाक अधीक्षक