आत्म्याच्या शांतीसाठी निष्पाप कृष्णाचा बळी..!
By Admin | Published: April 29, 2017 11:47 PM2017-04-29T23:47:54+5:302017-04-29T23:48:39+5:30
कळंबअंधश्रद्धेचे भूत मानगुटीवर बसले की माणूस एखाद्या निष्पापाचाही जीव घेण्यास मागेपुढे पाहत नाही.
उन्मेष पाटील कळंब
अंधश्रद्धेचे भूत मानगुटीवर बसले की माणूस एखाद्या निष्पापाचाही जीव घेण्यास मागेपुढे पाहत नाही. याचा अनुभव तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील कृष्णा इंगोले या सहा वर्षीय मुलाच्या हत्या प्रकरणामध्ये पहावयास मिळाला. जानेवारी-२०१७ मध्ये झालेल्या कृष्णाच्या हत्येच्या तपासामध्ये पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेऊन या प्रकरणाचा भांडाफोड केला.
तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथे २७ जानेवारी रोजी कृष्णा इंगोले या सहा वर्षीय मुलाची हत्या झाल्याची बातमी समोर आली अन् एकच खळबळ उडाली. पिंपळगाव शिवारातील एका विहिरीजवळ कृष्णाचा मृतदेह आढळला होता. त्या शेजारी या हत्येमध्ये वापरलेल्या लाकडी रुमण्याखेरीज काहीच आढळले नाही. प्रथमदर्शनी हा प्रकार अंधश्रद्धेतून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. कृष्णाची आई सारिका इंगोले हिने कळंब पोलिसांत फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली घाटगे, पो.नि. सुनील नेवसे यांच्या टीमने या प्रकरणाचा कसून तपास हाती घेतला. घटनेच्या दिवशी अमावस्या असल्याने अंधश्रद्धा मानणारी मंडळी अघोरी विद्या तसेच पूजा-अर्चासारखे प्रकार करीत असतात. अशा काही विधी या परिसरात झालेत का याची चौकशी पोलिसांनी सुरू केली. तपासामध्ये मूळचे पिंपळगाव येथील परंतु सध्या पुणे येथे स्थायिक असलेले उत्तम इंगोले, उर्मिला इंगोले व साहेबराव इंगोले हे घटनेच्या काळामध्ये पिंपळगाव येथे येऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच पुणे येथील तांत्रिक बुवा लखन उर्फ राहुल चुडावकर यांच्याशी ते नियमित मोबाईलद्वारे संपर्कात असल्याचे तपासादरम्यान पोलिसांच्या निदर्शनास आले. या माहितीवरून ४ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी लखन चुडावकर, उर्मिला इंगोले व उत्तम इंगोले यांना अटक केले. त्यांच्याकडे कसून चकशी करूनही या प्रकरणातील स्पष्ट चित्र समोर येत नव्हते. पुन्हा पोलीस यंत्रणांनी तपासाची चक्रे वेगळ्या दिशेने फिरविली. या प्रकरणात साहेबराव इंगोले तसेच कृष्णाची आत्या द्रौपदी उर्फ लक्ष्मी पौळ हिाचाही सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या दोघांना जेरबंद केल्यानंतर या संपूर्ण घटनेवरून पडदा उठविण्यात पोलिसांना यश आले. कृष्णाची आत्या द्रौपदी हिने पोलिसांसमोर या घटनेचा वृत्तांत सांगितल्यानंतर काही काळ तेही अवाक् झाले होते.