ई-लिलावासाठी कृउबाला आदेश
By Admin | Published: July 16, 2017 12:28 AM2017-07-16T00:28:19+5:302017-07-16T00:35:38+5:30
औरंगाबाद : राज्यातील पहिल्या टप्प्यातील ३० बाजार समित्यांना १५ आॅगस्टपूर्वी शेतीमालाची आॅनलाइन लिलाव पद्धत सुरूकरण्याचे आदेश कृषी व पणनचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी दिले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्यातील पहिल्या टप्प्यातील ३० बाजार समित्यांना १५ आॅगस्टपूर्वी शेतीमालाची आॅनलाइन लिलाव पद्धत सुरूकरण्याचे आदेश कृषी व पणनचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी दिले आहेत. यादृष्टीने जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत्या २९ दिवसांत शेतीमालाच्या हर्राशीची पारंपरिक पद्धत बंद होऊन आॅनलाइन लिलाव पद्धत अस्तित्वात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य भाव मिळावा, बाजार समितीच्या कारभारात, लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण व्हावी, शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबविण्यात यावी. यासाठी केंद्र सरकारने ‘इलेक्ट्रॉनिक नॅशनल अॅग्रिकल्चरल मार्केट’ (ई-नाम) पोर्टल सुरू केले आहे. याद्वारे देशभरातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या आॅनलाइन एकमेकांना जोडल्या जाणार आहेत. यामुळे औरंगाबादेतील जाधववाडीत आलेला शेतीमाल परजिल्ह्यातील कृउबामधील खरेदीदार खरेदी करू शकतील. खरेदीदारांमध्ये स्पर्धा वाढल्याने शेतीमालास चांगला भाव मिळेल. राज्यात पहिल्या टप्प्यात ३० बाजार समित्यांमध्ये ‘ई-नाम’ सुरूकरण्यात येणार आहे.
यासंदर्भात शुक्रवारी कृषी व पणनचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी पुणे येथे राज्यातील कृउबाच्या सचिवांची बैठक घेतली. पहिल्या टप्प्यातील सर्व बाजार समित्यांना येत्या १५ आॅगस्टच्या अगोदर आॅनलाइन लिलाव सुरूकरण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे बाजार समित्यांचे कर्मचारी कामाला लागले आहेत. केंद्र शासनाने जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १३ कॉम्प्युटर, १३ यूपीएस, ४ लेझर प्रिंटर, १ एलईडी, २ वेबकॅमेरे, २ टॅब्लेट आदी साहित्य दिले आहे. बाजार समितीने लीज लाइनसाठी बीएसएनएलकडे रक्कम भरली असून, येत्या ८ दिवसांत लीज लाइन टाकण्यात येणार आहे. धान्याच्या अडत बाजारातील ४ सेल हॉलमध्ये ई-लिलावासाठी संगणक व अन्य यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यासाठी सेलहॉलमध्ये छोटी केबिन तयार करण्यात येईल. येत्या बुधवारी १९ जुलै रोजी ई-लिलावाचे प्रात्यक्षिक घेतले जाईल, अशी माहिती सचिव विजय शिरसाठ यांनी दिली. १५ आॅगस्टआधीच ई-लिलाव सुरूकरण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. सॉफ्टवेअर कंपनीने बाजार समितीमध्ये एका मंडी अॅनलिस्टची नेमणूक केली आहे. ई-लिलावासाठी ५८ पैकी ४६ अडत्यांना व ८१ खरेदीदारांना कंपनीतर्फे प्रशिक्षण देण्यात आले आहे. बाजार समितीच्या चार कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जात आहे.