राष्ट्रवादीच्या मोर्चाकडे क्षीरसागर बंधुंची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:35 PM2017-10-23T23:35:20+5:302017-10-23T23:35:20+5:30
राष्टÑवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा धडकत असताना दुसरीकडे पक्षाचेच स्थानिक लोकप्रतिनिधी आ. जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या गैरहजेरीची कुजबूज जोरदार घोषणाबाजीतही कानावर पडत होती.
सतीश जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : एकीकडे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर राष्टÑवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा धडकत असताना दुसरीकडे पक्षाचेच स्थानिक लोकप्रतिनिधी आ. जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या गैरहजेरीची कुजबूज जोरदार घोषणाबाजीतही कानावर पडत होती.
नरेंद्र मोदीच्या प्रचंड झंझावातात आणि गोपीनाथराव मुंडे यांच्याबद्दलच्या सहानुभूतीच्या लाटेत जिल्ह्यात राष्टÑवादीची वाताहत होत असताना या क्षीरसागर बंधुंनी आपला बीड किल्ला अभेद्द राखला होता. या किल्ल्यासही शिवसंग्रामच्या विनायक मेटेंनी भगदाड पाडण्याचा प्रयत्न केला, निकराची झुंज दिली परंतु त्यांनाही यश आले नाही. विधानसभेची बीडची जागा राखत जयदत्त क्षीरसागर यांनी राष्टÑवादी काँग्रेसची लाज राखली होती. परंतु त्यानंतरच्या काळात राष्टÑवादीअंतर्गतचा कलह वाढत गेला. नगर परिषद, जिल्हा परिषद निवडणुकीत तर पक्षांतर्गतची गटबाजी उफाळून आली. ज्याप्रमाणे मुंडे आणि पंडितांच्या घरातील भाऊबंदकी जिल्ह्याने बघितली, त्याचाच कित्ता पालिका निवडणुकीत क्षीरसागर घराण्यात बघावयास मिळाला. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत चक्क डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याविरुद्धच सख्खे बंधू रवींद्र क्षीरसागर रिंगणात उतरले. क्षीरसागर घराण्यातील ही दरी आणखी वाढत गेली आणि त्याचा परिणाम जिल्हा परिषद निवडणुकीतही पहावयास मिळाला. जि.प. निवडणुकीत पुतणे संदीप क्षीरसागर यांनी काकू-नाना आघाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा काकांनाच शह दिला. घरातील या कलहास बारामतीच्या पवारांचीच फूस होती, असा समज क्षीरसागर बंधूंचा झाला आणि त्यानंतर हे दोघेही दिवसेंदिवस राष्टÑवादी काँग्रेसपासून दूर होत गेले. ज्यांनी पक्षाच्याविरुद्ध कारवाया केल्या, त्यांनाच बारामतीच्या काका-पुतण्यांनी जवळ केले, असे दृष्य जिल्ह्याने बघितले. पुतण्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून काकांना शह देण्याचा प्रयत्न होता. पक्षविरोधी कार्य करणा-यांना कारवाईऐवजी शाबासकी दिली. ही गोष्ट न रुचल्याने त्यानंतरच्या राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांपासून क्षीरसागर बंधू दूर रहात गेले. काही दिवसांपूर्वी अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता. परंतु या मेळाव्याकडेही क्षीरसागर बंधूंनी पाठ फिरवली होती.
आजच्या मोर्चातही आमदार आणि नगराध्यक्ष दोघेही अनुपस्थित राहिले. क्षीरसागर यांच्याप्रमाणेच अंबाजोगाईत नंदकिशोर मुंदडा हेही पक्षाचे नेते म्हणून ओळखले जातात. पक्षनिष्ठ असलेले नंदूसेठही या मोर्चात कुठे दिसले नाहीत.
अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यासही नंदूसेठ देखील उपस्थित नव्हते. एकीकडे क्षीरसागर आणि नंदकिशोर मुंदडा यांचे पक्षाशी असलेले मतभेद वाढत असताना दुसरीकडे मात्र संदीप क्षीरसागर आणि उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर हे मात्र पक्षांतर्गतच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय झाले आहेत.
जिल्ह्यात पक्षांतर्गत एवढे रामायण घडत असताना देखील बारामतीने मात्र हा दुरावा दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे कुठे दिसले नाही, काही का असेना राष्टÑवादी पक्ष मात्र दुहीच्या गर्तेत सापडला आहे.