कोमेजू लागले हिरवे स्वप्न!
By Admin | Published: June 24, 2017 12:23 AM2017-06-24T00:23:14+5:302017-06-24T00:24:37+5:30
जालना : पावसाने दहा दिवसांपासून दडी मारल्याने कपाशीच्या झाडांनी आता माना टाकायला सुरुवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे खरेदीकरून उत्साहाने पेरणीची कामे सुरू केली. जमिनीत ओलावा असल्याने पिकांची उगवणही चांगली झाली. परंतु पावसाने दहा दिवसांपासून दडी मारल्याने कपाशीच्या झाडांनी आता माना टाकायला सुरुवात केली आहे. दमदार पावसाअभावी शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न कोमेजू लागले आहे.
जिल्ह्यात यंदा सरासरी सहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी नियोजन आहे. सुरुवातीला भोकरदन, बदनापूर, जालना तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कपाशी व मका लागवड केली. कापसाची ४३, तर मका पिकाची २३ टक्के लावगड झाली आहे. बहुतांश भागात मूग, उडीद, सोयाबीन पेरणीही पूर्ण करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ७५ हजार हेक्टरवर खरिपाची ३० टक्के पेरणी पूर्ण झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. मात्र, गत दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे ठिबक सिंचनवर कपाशी लागवड केलेले शेतक री थेंब, थेंब पाण्याचा काटकसरीने वापर करताना दिसत आहेत. तर ठिबकची सुविधा नसलेले जालना, भोकरदन, बदनापूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी कपाशी पिकाला हाताने पाणी घालून जगविण्याचा प्रयत्न करत आहेत.
सकाळचे ऊन आणि दुपारचे ढगाळ वातावरण पाहून आज पाऊस पडलेच, या आशेवर असलेले शेतकरी आता पेरणी वाया जाण्याच्या शक्यतेने चिंतातुर झाले आहेत. पाऊस लांबल्याने जिल्ह्यात अद्याप ७० टक्के क्षेत्रावर अद्याप पेरणी झालेली नसल्याने मूग, उडिदाचे क्षेत्र घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.