‘कुंडलिके’चा घोटला गळा

By Admin | Published: June 17, 2014 12:06 AM2014-06-17T00:06:12+5:302014-06-17T01:14:22+5:30

पंकज कुलकर्णी , जालना एकेकाळी शहराची जीवनवाहिनी असलेल्या कुंडलिका नदीचा गळाच घोटला गेला असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.

'Kundalik' is a stroke of throat | ‘कुंडलिके’चा घोटला गळा

‘कुंडलिके’चा घोटला गळा

googlenewsNext

पंकज कुलकर्णी , जालना
देशातील प्रमुख नद्या स्वच्छ करण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे. याच धर्तीवर जालन्यातील नद्यांची काय स्थिती आहे, याची पाहणी केली असता एकेकाळी शहराची जीवनवाहिनी असलेल्या कुंडलिका नदीचा गळाच घोटला गेला असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. ऐके काळी कुंडलिका नदीच्या पाण्यावरच शहराची तहान भागवली जात असे; पण घाणेवाडीचे पाणी शहरात आले आणि काळाच्या ओघात या नदीचे गटार कधी झाले, हे कळालेच नाही. या नदीची परिक्रमा करीत असताना जागोजागी नदीपात्रात माती-मुरमाचा, केरकचऱ्याचा भराव टाकून अतिक्रमण थाटल्याचे आढळून आले असून, अवैधरीत्या पाणी उपसाही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून आले. आता शिल्लक राहिलेल्या पात्रात ठिकठिकाणी ड्रेनेज लाईन सोडल्याने ‘गंगा मैली’ झाली आहे.
घाणेवाडी तलावापासून दक्षिणेकडे कुंडलिका नदी वाहते आहे. कधीकाळी बारमाही वाहणारी नदी आज मात्र डबके बनली आहे. शहरालगतच्या नदीपात्रात जागोजागी माती-मुरूमाचा भराव टाकून सर्रास शेकडो अतिक्रमणे थाटली गेली आहेत. त्यामुळे या नदीचे पात्र काही ठिकाणी अरूंद, निमुळते तर काही ठिकाणी लूप्तच झाले असल्याचे विदारक व भयावह दृश्य समोर आले आहेत.
घाणेवाडीच्या खाली या नदीपात्रात निधोना तसेच रामतीर्थ स्मशानभूमीजवळ दोन शिरपूर पॅर्टर्नवर बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे का असेना दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. मात्र, अन्यत्र नदीपात्र कोरडेठाक आहे. या कोरड्या पात्रात ठिकठिकाणी विदारक असे दृष्य आहे. रामतीर्थ बंधाऱ्यापासून पुढे राजाबागा सवार दर्गाजवळ या पात्राला धोबीघाटाचे स्वरूप आले आहे. तर पुढे देहेडकरवाडी जवळील पात्रात केरकचऱ्याचे ढिग तसेच विविध भागातील ड्रेनेजचे पाणी सर्रास सोडण्यात आले आहे. अलीकडे या भागात मोठ्या प्रमाणावर भराव टाकून जागा बळकविण्यात आल्या आहेत.
शहरातून वाहणाऱ्या या नदीपात्रात शौचास जाणारे महाभागही काही कमी नाहीत. परिणामी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. आधीच बेशरमाची, बाभळी झाडे व अन्य झुडपे मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. त्यातच नगर पालिका तसेच परिसरातील नागरिकांकडून प्लास्टीक सह इतर कचरा प्रचंड प्रमाणात नदीपात्रात आणून टाकला जात असल्याने पात्र हळूहळू लूप्त होत आहे. वास्तविकता नदीचे पुनरुज्जीवन करणे नितांत गरजेचे आहे.
नदी वाचविण्यासाठी शहरवासीयांचे प्रयत्न
घाणेवाडी जलसंरक्षण मंचासह इतर सामाजिक संघटनांसह लोकसहभागातून दीड-दोन वर्षापूर्वी नदी सफाई अभियान राबविण्यात आले.
घाणेवाडी जलसंरक्षण मंचच्या वतीने रामतीर्थ येथे शिरपूर पॅटर्नवर आधारीत बंधारा बांधण्यात आला.
निधोना येथे शिरपूर पद्धतीचा बंधारा लोकसहभागातून बांधण्यात आला.
दोन्ही बंधाऱ्यांव्यतिरिक्त इतर सहा ठिकाणी या नदीवर बंधारे बांधण्यात येणार आहेत.
सहा बंधारे बांधण्यासाठी मुख्यमंत्री निधीतून ८ कोटी रूपये मंजुर करण्यात आले आहेत.
मैलायुक्त, सांडपाणी कोणत्या नाल्यातून नदीत सोडण्यात आले?
जुना जालना भागातील देहेडकरवाडी, जुनी नगर पालिका इमारत, टट्टूपुरा मस्तगड परिसराह काद्राबादच्या मागील भागातील सर्व सांडपाणी, केरकचरा या नदीपात्रात सर्रास वर्षानुवर्षापासून टाकला जातो.

शहरातून वाहणारी दुसरी नदी म्हणजे सीना. ही नदी शहरातील गणेश घाट परिसरात येऊन मिळाली आहे. त्यामुळे या ठिकाणी दोन नद्यांचा संगम झालेला आहे. मात्र, सीना नदीही मोठ्या प्रमाणात घाणेरडी झाली आहे.

गणेशघाटाच्या पुढे नवीन जालना भागातून काद्राबाद, चमडा बााजार, गांधीनगर, रामनगर या ठिकाणचेही सांडपाणी सर्रासपणे या नदीच्या पात्रात सोडण्यात येते. पालिका प्रशासनाकडून या संदर्भात काडीचीही आडकाठी केली जात नाही. परिणामी वर्षानुवर्षापासून हे सत्र सुरू आहे. त्यामुळे नदीपात्र बकाल व दुर्र्गंधीयुक्त बनले आहे.

जुना व नवीन जालना भागातील नदी काठावरील वसाहतींमधुन सोडण्यात येत असलेल्या सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. बाराही महिने नागरिक या दुर्गंधीचा सामना करत आहेत. तसेच डासांचाही मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला असून साथीचे रोगही या वसाहतींमधून नित्याचे झाले आहेत.
कुंडलिका नदी परिक्रमा...
एकेकाळी शहराचे वैभव मानली जाणारी कुंडलिका नदीची आजची अवस्था काय आहे, हे पाहण्यासाठी नदीची परिक्रमा केली. घाणेवाडी तलावापासून निधोना बंधारा- रामतीर्थ बंधारा- राजाबागा सवार दर्गा- टट्टुपुरा, कैकाडी मोहल्ला, देहेडकरवाडी, जुनी न.प. इमारत, मस्तगड, लोखंडी पुल- एमएसईबी परिसर- भालेनगरी- पंचमुखी महादेव मंदिर- मियाँसाहब दर्गा- दर्गा बेस- चमडा बाजार- रामनगर- गांधीनगर- पीपल्स बँक कॉलनी ते मंठा मार्ग बायपासपर्यंतच्या ८ ते १० कि.मी.च्या नदीच्या मार्गाची सोमवारी पाहणी करण्यात आली.

Web Title: 'Kundalik' is a stroke of throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.