के.व्ही. काळे यांच्या संशोधनाला पेटंट; उपग्रहाद्वारे घेतलेल्या हैपरस्पेक्टरल इमेजचे विश्लेषण तंत्र विकसित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 05:35 PM2021-02-03T17:35:24+5:302021-02-03T17:36:08+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधन
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागातील डॉ. के.व्ही. काळे यांच्या संशोधनाला ऑस्ट्रेलियन पेटंट मंजूर झाले आहे.
डॉ. काळे हे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून अनुदानित आणि ‘जिओस्पेशिअल टेक्नॉलॉजी’ या जागतिक दर्जाच्या विषयावर आधारित राष्ट्रीय संशोधन प्रकल्पावर मागील काही वर्षांपासून संशोधन करत आहेत. त्यांनी उपग्रहाद्वारे घेतलेल्या ‘हैपरस्पेक्टरल इमेजेस’चे विश्लेषण करण्यासाठीचे अचूक तंत्रज्ञान विकसित केले आहे. या संशोधनामध्ये डॉ. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश सोलंकर आणि धनंजय नलावडे या संशोधक विद्यार्थ्यांनी काम केले आहे.
जागतिक पातळीवरील विकसित अवकाश तंत्रज्ञानामुळे ‘हैपरस्पेक्टरल इमेजेस’चा उपयोग करून पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अनेक पदार्थांचा अभ्यास करणे सुलभ झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे पृथ्वीच्या भूभागावरील कोणत्याही पदार्थाचे अत्यंत सूक्ष्म पद्धतीने विश्लेषण व वर्गीकरण करणे आता शक्य होणार आहे. या संशोधनाची उपयुक्तता ही भारत सरकारच्या अवकाशातून मातीपरीक्षण, पाणी गुणवत्ता तपासणी, पीक प्रकार ओळखणे, पीक आरोग्य तपासणी, पीक उत्पन्नाचा अंदाज लावणे, दुष्काळाची तीव्रता तपासणे आणि नैसर्गिक आपत्ती विश्लेषण करणे यासारख्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी फायदेशीर आहे.
या ऑस्ट्रेलियन पेटंटसोबतच डॉ. काळे यांनी त्यांच्या संशोधनावर आधारित इतर ७ भारतीय पेटंट हे भारतीय पेटंट जर्नलमध्ये प्रकाशित केले आहेत. संशोधनामधील या आंतरराष्ट्रीय पातळीच्या यशामुळे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्रकुलगुरू श्याम शिरसाट, संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सचिन देशमुख आणि विभागातील सहकारी प्राध्यापकांनी डॉ. काळे आणि त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.