कयाधू नदीचे पात्र अद्याप कोरडेच
By Admin | Published: August 24, 2014 11:45 PM2014-08-24T23:45:32+5:302014-08-24T23:55:02+5:30
नर्सी नामदेव : हिंगोली जिल्ह्यातील नर्सी येथे संत नामदेव महाराज मंदिराजवळून वाहत असलेली कयाधू नदी कोरडी पडली आहे.
नर्सी नामदेव : हिंगोली जिल्ह्यातील नर्सी येथे संत नामदेव महाराज मंदिराजवळून वाहत असलेली कयाधू नदी कोरडी पडली आहे. यामुळे तेथे अस्थी विसर्जन करण्याचा प्रश्न सर्वांसमोर उभा राहत आहे. यासाठी नदीत अस्थीकुंड स्थापन करावे, अशी भाविकांची मागणी आहे.
संत नामदेव मंदिरालगतच कयाधू ही नदी वाहते. पुर्वीपासूनच या ठिकाणी अस्थी विसर्जन करण्याचा कार्यक्रम पार पडतो. या नदीच्या पाण्याने काया धुतली जाते, असे मानले जाते. त्यामुळे संत नामदेवांमुळे पावन झालेल्या या तिर्थस्थळास विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या ठिकाणी दररोज ४ ते ६ गावांचे अस्थी विसर्जन करण्यासाठी उतरक्रीया पार पाडण्याचे विधीवत पुजन केले जाते. याच ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आदींच्या अस्थी विसर्जनाचे कार्यक्रम पार पाडले आहेत. या ठिकाणी वर्षभर हा विधी होतो; परंतु यावर्षी पावसाळा कोरडाच जात आहे म्हणून नदीही कोरडी पडली आहे. दुरवरून येणाऱ्या भाविकांची अस्थी विसर्जनासाठी गैरसोय होत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत किंवा कुठल्याही निधीतून अस्थीकुंड बांधण्यात यावे, जेणे करून ही गैरसोय दूर होईल, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
संत नामदेव मंदिराजवळून वाहणाऱ्या कयाधू नदीचे पात्र कोरडे पडल्याने तेथे अग्नीकुंड उभारण्याची मागणी होत आहे.