पेट्रोल परवडेना म्हणून घेतला घोडा, ‘जिगर’वर सफर करताना इंधनाची फिकीर सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 11:11 AM2021-12-09T11:11:46+5:302021-12-09T11:18:01+5:30
सहा महिन्यांपूर्वी ४० हजार रुपयात काठियावाडी घोडा विकत घेतला आणि आता कामावरच नाही तर शहरात कुठेही जायचे म्हटले तरी ते घोड्यावरच जातात.
- शेख मुनीर
औरंगाबाद : पेट्राेल-डिझेलच्या किमती बेलगाम (Fuel Hike) झाल्या म्हणून काय झाले, ज्याच्या हाती लगाम त्याला कशाची फिकीर? अर्थकारणाचा बारकाईने विचार करून शहरातील एका बहाद्दराने चक्क दुचाकी स्टॅंडवर उभी करून घोड्यावर मांड ठोकली आहे (Lab technician from Aurangabad purchased horse due to petrol price hike). हा सुशिक्षित दररोज आपल्या लाडक्या ‘जिगर’ घोड्यावरून महाविद्यालयात नोकरीला जातो. तेथे मोटारसायकल स्टॅंडवरच आपला घोडा ‘पार्क’ करतो आणि संध्याकाळी ड्यूटी संपवून घोड्यावरूनच घरी परततो !
इंधन दरवाढीविरुद्ध राजकीय पक्ष आंदोलने करतात तेव्हा बैलगाडी किंवा घोडे आणून उत्साह दाखवतात; पण प्रत्यक्षात या महागाईला वैतागून घोड्याचा वापर करणारा विरळाच ! शेख युसूफ शेख ताजोद्दीन, वय ५० वर्षे. घर मिटमिट्यात आणि नोकरी हिमायतबागेजवळ एका महाविद्यालयात, सुमारे १५ किलोमीटरवर. युसूफ सांगतात, ‘मी एक लॅब टेक्निशियन म्हणून काम करतो. आधी इतरांसारखी मोटारसायकलच वापरायचो. पेट्राेलची शंभरी गाठण्याची चिन्हे पाहून पोटात गोळा आला. कुटुंबात पत्नी, तीन मुले, मुलगी. पगारावरच सर्वांचे शिक्षण आणि उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे खर्च कमी करण्याचाच विचार करायचो. आजोबांनी एक घोडा हौसेखातर पाळला होता. त्यामुळे कुटुंबात घोड्याचे महत्त्व माहीत होते. मीदेखील घोडाच वापरण्याचे ठरवले. सहा महिन्यांपूर्वी ४० हजार रुपयात काठियावाडी घोडा विकत घेतला आणि आता कामावरच नाही तर शहरात कुठेही जायचे म्हटले तरी घोड्यावरच जातो.’
गेल्या सहा महिन्यांपासून मी घोडेसवारी करतो. त्यामुळे माझी तब्येतही ठणठणीत राहते, असे ते सांगतात. आता तर त्यांच्या रोजच्या रस्त्यावरील अनेकजण परिचित झाले आहेत. कॉलेजमध्येही विद्यार्थी त्यांना ‘घोडेवाले मामा’ म्हणून ओळखतात. घोडा ४० ते ५० किमी वेगाने धावतो. त्यामुळे दुचाकीच्या तुलनेत कुठेही पोहोचण्यास वेळही फार लागत नाही. लोकांनी वाहतुकीसाठी अशी इमानदार, दमदार, आरोग्यदायी सवारी केली पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे.
निम्मा खर्च
बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले युसूफ या घोड्याच्या चाऱ्यासाठी दररोज ५० रुपये खर्च करतात. मोटारसायकलला लागणाऱ्या पेट्राेलचा खर्च दुप्पट होता आणि दुरुस्तीचा खर्च वेगळाच. घोडा खूप प्रामाणिक, शांत स्वभावाचा प्राणी आहे. कुठेही बांधला तरी तो आसपासच्या लोकांना त्रास कधीच देत नाही. एकदा सकाळी आणि संध्याकाळी चारा-पाणी दिले की बस्स !