लेबर कॉलनीतील क्वॉर्टर्स करणार भुईसपाट...
By Admin | Published: May 20, 2016 12:32 AM2016-05-20T00:32:01+5:302016-05-20T00:36:44+5:30
औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरामध्ये मंत्रालयाच्या धर्तीवर विभागीय प्रशासकीय संकुल उभारण्याच्या प्राथमिक हालचाली सुरू झाल्या आहेत.
औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरामध्ये मंत्रालयाच्या धर्तीवर विभागीय प्रशासकीय संकुल उभारण्याच्या प्राथमिक हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या काही महिन्यांत इमारतीचा आराखडा, अंदाजपत्रक आणि पर्यायी जागेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाची निश्चिती झाली आहे. त्यासाठी लेबर कॉलनीतील २५० क्वॉर्टर्स असलेल्या जागेवरील शासकीय क्वॉर्टर्स भुईसपाट करण्यात येणार आहेत. बांधकाम विभागाने क्वॉर्टर्समधील गाळेधारकांना १५ दिवसांत इमारत खाली करण्यासाठी नोटिसा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. १९६१ मध्ये हे क्वॉर्टर बांधले असून, तेथे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. तेथील अनेकांनी क्वॉर्टरचा ताबा वेगवेगळ्या माध्यमातून स्वत:कडे ठेवला आहे. शासकीय जागा असल्यामुळे ती खाली करून घेण्याची तयारी विभागीय पातळीवर सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या मालकीचे उर्वरित क्वॉर्टरदेखील खाली करण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व्हे सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मार्च महिन्यात त्या संकुलाच्या संभाव्य आराखड्यावर विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. जागतिक बँक प्रकल्पांतर्गत हे संकुल बांधण्यात येणार आहे. बांधकाम विभागाकडे त्यासाठी जबाबदारी देण्यात आली असून, महसूल विभागाच्या मदतीने क्वॉर्टर पाडले जाणार आहेत.
भूमी अभिलेख, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तालय वगळता उर्वरित ४५ प्रशासकीय कार्यालये भाड्याच्या इमारतींमध्ये आहेत. त्या इमारती कार्यालयासाठी पोषक नाहीत; परंतु एकत्रित इमारत नसल्यामुळे पर्याय म्हणून ही कार्यालये भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. मराठवाड्यात कॅबिनेटमंत्री, सचिव दर्जाचे अधिकारी, आयुक्त, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटक येण्याचे प्रमाण वाढले आहे. मंत्रिमंडळ बैठक यंदा झाली नसली तरी २००९ पर्यंत ती सातत्याने होत गेली आहे. त्यामुळे विभागीय प्रशासकीय संकुलात मंत्रालयीन दर्जाचे बैठक सभागृह, सुसज्ज प्रशासकीय दालने, सर्व कार्यालयांचे एकत्रीकरण करण्यासाठी संकुल उभारण्यात येणार आहे.
१२ एकर जागा; ५० कोटींचा खर्च
या प्रशासकीय संकुलासाठी १२ एकर जागा लागणार आहे. ५० कोटींच्या आसपासचा खर्च या संकुलावर होण्याची शक्यता आहे.
लेबर कॉलनीतील शासकीय जागेवर हे संकुल बांधण्यात येणार असून, अंदाजपत्रकासाठी शासनाकडून मंजुरी घेण्यात येणार आहे. ३ वर्षांपर्यंतचा कालावधी हे संकुल बांधण्यासाठी लागेल. त्यासाठी तीन टप्पे करण्यात येतील.
महत्त्वाकांक्षी आणि औरंगाबाद शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे हे भव्य संकुल असावे. यासाठी सुनियोजित आराखडा तयार करण्यात आला आहे.