वाहनाच्या धडकेत मजूर जागीच ठार
By Admin | Published: April 22, 2016 12:28 AM2016-04-22T00:28:20+5:302016-04-22T00:40:33+5:30
गोरेगाव : धडकेत सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील रहिवासी असलेल्या एका ३५ वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १९ एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.
गोरेगाव : कुल्फी विक्री करणाऱ्या एका वाहनाने दिलेल्या धडकेत सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील रहिवासी असलेल्या एका ३५ वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १९ एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बाभूळगाव येथील गौतम कृष्णाजी कांबळे (वय ३५) हे रस्त्यावरून जात असताना मावाकुल्फी विक्री करणाऱ्या वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडताच वाहनासह चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. अपघाताची घटना काही ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी मयताच्या कुटूंबियांना तसेच गोरेगाव पोलिसांना याबाबतची माहिती दिली. मात्र एक ते दीड तास उशिराने बीट जमादार हे काही पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रूग्णवाहिकासुद्धा घटनास्थळी दाखल झाली. परंतु ही रूग्णवाहिका असून शववाहिका नसल्याचे कारण देत थोडा वेळ थांबून रूग्णवाहिका रिकामी परतली. त्यातच बीट जमादार पांडे यांनी सुध्दा मयताच्या नातेवाईकांना शव गोरेगाव येथे घेवून या व पोलीस ठाण्यात फिर्याद द्या असे सांगत घटनास्थळाचा पंचनामा न करता काढता पाय घेतला. त्यानंतर बाभूळगाव येथील ग्रामस्थांनी व मयताच्या नातेवाईकांनी खाजगी वाहनाच्या व्यवस्थेसाठी जि.प. सदस्य अनिल पतंगे यांच्याशी संपर्क साधला असता, पतंगे यांनी पाठविलेल्या वाहनामध्ये रात्री उशिरा १२ च्या सुमारास शव गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर पंजाब कांबळे यांच्या फिर्यादीवरून गोरेगाव ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस वर्तणुकीबद्दल संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)