Aurangabad Violence : लच्छू पहिलवानच दंगलीस कारणीभूत- इम्तियाज जलील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:08 AM2018-05-15T01:08:23+5:302018-05-15T01:08:42+5:30
शहरात घडविण्यात आलेली ही दंगल पूर्वनियोजितच होती. यामागे मास्टरमाइंड लच्छू पहिलवानच असून, त्याला राजकीय आश्रय देण्यात येत असल्याने पोलीस कारवाई करायला तयार नाहीत. दंगलीत कोणत्या व्यक्तीने कोणती भूमिका बजावली, हे आम्ही सांगण्यापेक्षा पुरावेच बरेच काही सांगत आहेत. दंगलीशी संबंधित विविध व्हिडिओ, फोटो आणि पुरावे जमा करण्याचे काम आम्ही करीत आहोत. पोलिसांनी कारवाई न केल्यास आम्ही न्यायालयीन लढाई लढण्यात तयार आहोत, असे मत आ. इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.
औरंगाबाद : शहरात घडविण्यात आलेली ही दंगल पूर्वनियोजितच होती. यामागे मास्टरमाइंड लच्छू पहिलवानच असून, त्याला राजकीय आश्रय देण्यात येत असल्याने पोलीस कारवाई करायला तयार नाहीत. दंगलीत कोणत्या व्यक्तीने कोणती भूमिका बजावली, हे आम्ही सांगण्यापेक्षा पुरावेच बरेच काही सांगत आहेत. दंगलीशी संबंधित विविध व्हिडिओ, फोटो आणि पुरावे जमा करण्याचे काम आम्ही करीत आहोत. पोलिसांनी कारवाई न केल्यास आम्ही न्यायालयीन लढाई लढण्यात तयार आहोत, असे मत आ. इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.
दंगलीच्या पार्श्वभूमीवर आ. जलील यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, ‘चोरी तो चोरी उपरसे सीनाजोरी,’ अशी भूमिका शिवसेनेची दिसून येत आहे. शहरातील दंगल हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी असती तर संपूर्ण शहर पेटले असते. एकाच भागात जाळपोळ, गोळीबार का? हे सर्व घडवून आणणारा व्यक्ती कोण? हे सर्वांना माहीत आहे. त्याला राजकीय आश्रय देणारेच आज पोलीस आयुक्तांकडे न्यायाची मागणी करीत आहेत. दंगलीत समाजकंटकांसोबत अनेक पोलीसही सहभागी झाले आहेत. त्याचे व्हिडिओच प्राप्त झाले आहेत.
मिटमिट्यात पोलिसांनी ज्या पद्धतीने अमानुषता दाखविली त्याचेच दर्शन जुन्या शहरात पाहायला मिळाले. दोषी पोलिसांवरही त्वरित कारवाई झाली पाहिजे. पोलिसांसमक्ष खाजगी रिव्हॉल्व्हरने गोळीबार करणारा नगरसेवक कोण? हे शोधून काढण्याचे कामही पोलिसांचे आहे. पोलिसांनी तीन तरुणांना हत्यारांसह ताब्यात घेतले. त्याला सोडविणारे राजकीय नेते कोण, याचाही व्हिडिओ आम्ही मिळविला आहे. शहागंज चमनमधील दुकाने हटविण्याची मागणी कोणी केली, फळविक्रेत्यांना कोणी मारहाण केली होती, व्यापाऱ्यांना हफ्ता कोणी मागितला होता, हे सर्व पोलिसांनाही माहीत आहे. वेळीच कारवाई करावी ही आमची अपेक्षा आहे. पक्षातर्फे जळालेली दुकाने पुन्हा बांधून देण्याचे काम करण्यात येणार असल्याचे आ. इम्तियाज जलील यांनी सांगितली.
मुख्यमंत्र्यांना पुरावे देणार
शहरातील दंगलीचे सर्व पुरावे आम्ही मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहोत. दंगलीत मरण पावलेला हारीस कादरीच्या काकाला पोलिसांनी घरात घुसून अमानुष मारहाण केली. मंत्र्यांना फिरण्यासाठी हेलिकॉप्टर आणि सहायक पोलीस आयुक्तांना मुंबईला हलविण्यासाठी शासन एअर अॅम्ब्युलन्स देत नाही. उद्या शहरात काही झाल्यास पोलीस अधिकारी पुढे कशाला जातील, शासनासाठी या सर्व बाबी लज्जास्पद आहेत. मिटमिट्याच्या दंगलीची चौकशी करणार होते मुख्यमंत्री; झाली का? मग या दंगलीचीही होईल कशावरून? शहर वाऱ्यावर सोडून पोलीस सुटीवर कसे जाऊ शकतात. रावसाहेब दानवे, खैैरे आणि स्थानिक आमदारांना आपल्या सोयीचा पोलीस आयुक्त हवा आहे. या वादात आयुक्तपद रिकामे असल्याचा आरोपही जलील यांनी केला.