गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप
By Admin | Published: August 22, 2016 12:48 AM2016-08-22T00:48:12+5:302016-08-22T01:29:38+5:30
परळी : द टर्निंग पाँईच्या वतीने रविवारी येथे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंतांचा गौरव सोहळा पार पडला. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे अध्यक्षस्थानी होत्या.
परळी : द टर्निंग पाँईच्या वतीने रविवारी येथे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंतांचा गौरव सोहळा पार पडला. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे अध्यक्षस्थानी होत्या. खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. संगीता ठोंबरे, आ. आर. टी. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू असलेले रमेश घोलप व अभिनेत्री सई ताम्हणकर हे कार्यक्र माचे खास आकर्षण होते.
स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून द टर्निंग पाँईट हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू आहे. याअंतर्गत हा कार्यक्रम हालगे गार्डनमध्ये घेण्यात आला.
२०१२ साली लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात अव्वल आलेले रमेश घोलप यांनी आपल्या यशाचा पट उलगडला. दीड वर्षांचा असताना पोलिओ झाला. बारावीत असताना वडीलांच्या निधनानंतर गावी जायला दोन रूपये नव्हते.मात्र, हार मानली नाही, असे ते म्हणाले.
अभिनेत्री सई ताम्हणकर हिनेही खडतर परिश्रमाशिवाय यश मिळत नाही हे सोदाहरण स्पष्ट केले. ती म्हणाली, सांगलीतून मुंबईत आल्यावर पैसे नसायचे. आयुष्यात चांगले आणि वाईट टर्निंग पॉर्इंट येतात. अशा प्रसंगातून वाट काढणे महत्वाचे असल्याचा मंत्र तिने दिला. इतर मान्यवरांचीही भाषणे झाली.
सूत्रसंचालन ज्ञानोबा सुरवसे, प्रास्ताविक प्रा. पवन मुंडे व आभार प्रदर्शन सचिन गित्ते यांनी केले. कार्यकर्ते, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)
वडील गोपीनाथराव मुंडे असतानाच मी राजकारणात आले. परंतु माझे वर्तूळ मर्यादित होते. त्यांच्या अपघाती निधनाने माझ्याकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या. अनपेक्षितपणे मला वडिलांच्या भूमिकेत यावं लागलं हाच आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पाँईट असल्याचे पालकमंत्री पंकजा म्हणाल्या.