विभागीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 09:53 PM2019-05-13T21:53:09+5:302019-05-13T21:53:21+5:30
घाटी रुग्णालयातील विभागीय रक्तपेढीला रक्ताच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळी सुट्या, लग्नसराईमुळे रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील विभागीय रक्तपेढीला रक्ताच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळी सुट्या, लग्नसराईमुळे रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा फटका गोरगरीब रुग्णांना बसत आहे. रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन विभागीय रक्तपेढीतर्फे करण्यात आले आहे.
घाटीतील विभागीय रक्तपेढीमध्ये दररोज जवळपास सुमारे ६० ते ७० बॅग रक्त आणि रक्तघटकांची मागणी असते; परंतु उन्हाळी सुट्यांमुळे रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शहरातील शिबिरांचे आयोजन थंडावले आहे. त्यामुळे घाटीतील विभागीय रक्तपेढीला तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे.
घाटीत थॅलेसीमियाचे दररोज किमान आठ ते दहा रुग्ण येतात. अपघातग्रस्त रुग्णांची संख्याही अधिक आहे. उपचारासाठी अनेकदा रुग्णांना रक्त देणे आवश्यक असते. अशावेळी रुग्ण रक्तपेढीकडे धाव घेतात. मात्र, रक्ताच्या टंचाईमुळे त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते. रुग्णांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने काळजी घेतली जाते. तुटवडा दूर करण्यासाठी रक्तदानाचे आवाहन करण्यात आले आहे.