पेठेनगर, नेहरूनगर व जेतवन वसाहतींमध्ये नागरी सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:02 AM2021-05-16T04:02:16+5:302021-05-16T04:02:16+5:30
औरंगाबाद: शहरातील पेठेनगर वसाहती अंतर्गत नेहरुनगर, जेतवन आदी वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक राहत आहेत, परंतु या भागात नागरी सुविधांचा ...
औरंगाबाद: शहरातील पेठेनगर वसाहती अंतर्गत नेहरुनगर, जेतवन आदी वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक राहत आहेत, परंतु या भागात नागरी सुविधांचा प्रचंड अभाव आहे.
नेहरूनगर वसाहतीत तर घंटागाडीचे तोंडही रहिवाशांना बघायला मिळालेले नाही. त्यामुळे गृहिणींना सुका कचरा एक तर जाळून टाकावा लागतो किंवा त्याची विल्हेवाट लावावी लागते. ओला कचरा मोकळ्या जागी इतस्तत: फेकून देत असल्याने त्यावर मोकाट जनावरे चरताना दिसतात. महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या घंट्यागाड्यांची संख्या या भागात वाढविण्याची गरज नागरिकांनी बोलून दाखवली. पिण्याचे पाणी मिळत नसल्याने रहिवाशांना पदरमोड करून जारचे पाणी विकत घेण्याची पाळी आलेली आहे. या वसाहतींमध्ये मोठ्या व्यासाच्या जलवाहिनीचे काम झाल्यास पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो. मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे तर अंतर्गत रस्ते कच्चे असल्याने पावसाळ्यात चिखलातूनच ये-जा करावी लागते. रस्त्यांचे डांबरीकरण करणे आवश्यक आहे. पथदिवे कधी सुरू तर कधी बंद असतात. नवीन वसाहतीमध्ये अद्यापही पथदिव्यांची उभारणी केलेली दिसत नाही. या भागात मोकाट जनावरांचाही मुक्त वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे.