वैजापुरात आरोग्य सुविधांची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:02 AM2021-04-18T04:02:01+5:302021-04-18T04:02:01+5:30
वैजापूर : शासकीय कोविड सेंटरमध्ये आरोग्य सुविधांची वानवा सुरू झाली आहे. त्यामुळे रुग्णांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे ...
वैजापूर : शासकीय कोविड सेंटरमध्ये आरोग्य सुविधांची वानवा सुरू झाली आहे. त्यामुळे रुग्णांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. फिजिशिअन, सीटीस्कॅन मशीन, रुग्णवाहिकेचा अभाव असल्याने आरोग्यसेवा कोलमडली आहे. येथील कर्मचारी भरती, यंत्रसामुग्रीसाठी मंत्रीस्तरावर त्वरित पाठपुरावा करणार आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. भागवत कराड यांनी केले.
तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, वैजापूर तालुक्यात २९ हजार ४४३ कोविड चाचण्या करण्यात आल्या. यात १५ हजार ४१५ आरटीपीसीआर व १४,०२८ रॅपिड अँटिजेन टेस्टचा (आरएटी) समावेश आहे. गेल्या वर्षभरात ४,७७१ कोरोना रुग्ण सापडले. दुसरी लाट सुरू झाल्यापासून फेब्रुवारी महिन्यापासून केवळ तीन महिन्यांत तालुक्यात तब्बल २,४९७ रुग्ण आढळून आले. १६४ गावांपैकी केवळ नऊ गावे वगळता सर्व गावात कोरोनाचा फैलाव झाला आहे. ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. उपजिल्हा रुग्णालयात अठरा जागा मंजूर असताना केवळ १३ डॉक्टर्स रुजू आहेत. यात फिजिशियन (तज्ज्ञ डॉक्टर) नाही. येथे फिजिशियन नेमण्याचा अधिकार आरोग्य उपसंचालकांनाही नसल्याने याबाबत औरंगाबाद येथे होणाऱ्या बैठकीत मागणी मांडून मंत्रीस्तरावर बोलणी करणार असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. या बैठकीला भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, एकनाथ जाधव, कल्याण दांगोडे, कैलास पवार, ज्ञानेश्वर जगताप यांची उपस्थिती होती.