भराडीच्या बाजारात पशुधनाची बेभाव विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:10 AM2018-12-26T00:10:10+5:302018-12-26T00:14:47+5:30

हजारावर जनावरे आली विक्रीसाठी : दुष्काळ, पाणी -चारा टंचाईने बळीराजा हवालदिल

 Lack of livestock sale in the fodder market | भराडीच्या बाजारात पशुधनाची बेभाव विक्री

भराडीच्या बाजारात पशुधनाची बेभाव विक्री

googlenewsNext

प्रमोद शेजूळ
भराडी : सिल्लोड तालुक्यात भीषण दुष्काळ, पाणी व चारा टंचाईने बळीराजा हवालदिल झाला आहे. भराडी येथील जनावरांच्या आठवडी बाजारात एक हजारावर जनावरे विक्रीसाठी आली होती. जनावरे जास्त व जनावरे घेणारे व्यापारी कमी आल्याने कवडीमोल भावात जनावरांची विक्री झाली.
७० ते ८० हजारांची बैलजोडी हताश झालेल्या शेतकऱ्यांनी केवळ ४० ते ५० हजारात विकली.
तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून सतत दुष्काळ आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांनी पशुधन विक्रीस काढले आहे. बाजारात पशुधन विक्रीचे प्रमाण वाढल्याने भाव दुपटीने घसरले आहेत. मागील महिन्यात जनावरे बाजारात येण्याचे प्रमाण कमी होते, मात्र आता प्रमाण वाढले आहे.
काही शेतकरी चारा शोधण्यासाठी धावपळ करीत आहे. मात्र चाºयाचे भाव आकाशाला भिडले आहेत. ५०० ते ७०० रूपयाला मिळणारा कडबा आता २ ते ३ हजारात मिळत आहे. शिवाय कुट्टी करणे, वाहतूक खर्च हे सर्वसामान्य शेतकºयाला परवडणारे नाही. पाणी नसल्याने मकाची वाढ झाली नाही. यामुळे चारा कमी निघाला आहे. परजिल्ह्यात चारा मागणी वाढल्याने भाव वाढले आहेत. परजिल्ह्यात जाणारा चारा रोखला गेला तर किमान तालुक्यात शेतकºयांना चारा मिळेल. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
भराडी परिसरात मजुरांना काम नाही. रोजगार हमीची कामे अजून सुरु झाली नाही. कामाच्या शोधात मजूर परजिल्ह्यात जात आहेत. खरीप तर गेला रबीही नाही. तालुक्यातील अनेक गावांत पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. तालुक्यात दुष्काळ जाहीर असला तरी प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना अद्यापही सुरू झाल्या नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
चौकट...
पशुपालकांच्या डोळ्यात अश्रू
पोटच्या लेकरासारखा जीव लावलेले पशुधन बेभाव विकताना बळीराजाच्या डोळ्यात अश्रू येत होते. जनावरांचा उदरनिर्वाह कसा करावा, विकावे तर भाव नाही, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत. विक्रीसाठी आलेली गुरांची वाढती संख्या दुष्काळाचे विदारक चित्र सांगत आहे.
कोट......
मुलासारखी जपलेली बैलजोडी
दुष्काळी परिस्थितीमुळे इच्छा नसतानाही मुलासारखी जपलेली बैलजोडी कवडीमोल भावाने विक्री करावी लागली.
- नाना जिजा शेजूळ, शेतकरी, रा. उपळी.
व्यापारी झाले कसाई
माझ्याकडे चारा नाही. आगामी ६ महिने जनावरांचे पोट कसे भरावे, याची चिंता असल्याने ७० हजार रुपयांच्या बैलजोडीची व्यापाºयांनी केवळ चाळीस हजार रुपयांत बोली लावली. बाजारात जनावरे जास्त आल्याने व्यापारी कसाई झाले आहेत. त्यांनी कमी भावात जनावरे मागितली. नाइलाजाने ती विकावी लागली.
- सोमनाथ रामभाऊ गुंजाळ, रा मांडगाव

Web Title:  Lack of livestock sale in the fodder market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.