उपायांअभावी वाहतूक वेग मंदावला
By Admin | Published: July 9, 2014 12:43 AM2014-07-09T00:43:11+5:302014-07-09T00:45:59+5:30
औरंगाबाद : शहरातील रस्त्यांवर ना कोठे झेब्रा क्रॉसिंग, ना कोठे पार्किंग लाईन, ना कोठे रस्ता दुभाजक पट्ट्या आहेत.
औरंगाबाद : शहरातील रस्त्यांवर ना कोठे झेब्रा क्रॉसिंग, ना कोठे पार्किंग लाईन, ना कोठे रस्ता दुभाजक पट्ट्या आहेत. वाहतूक सुरळी राहावी, यासाठी गरजेच्या असलेल्या या उपाययोजना करण्याकडे पोलीस लक्ष देत नाही आणि मनपा प्रशासनही. या उपाययोजनांचा अभावही वाहतुकीच्या बेशिस्तीला हातभार लावताना दिसून येतो.
शहरातील वाहतुकीचा गेल्या काही वर्षांमध्ये पुरता बट्ट्याबोळ झाला आहे. त्याला रस्त्यारस्त्यांवर, चौकाचौकांमध्ये झालेली अतिक्रमणे, अरुंद रस्ते, वाहनचालकांचा बेशिस्तपणा जितका कारणीभूत आहे,
तितकाच रस्त्यांवरील सुविधांचा अभावही.
सिग्नलवर स्टॉप लाईनच नाहीत!
सिग्नल लागल्यानंतर वाहनचालकांनी वाहने कोठे थांबवावीत, यासाठी स्टॉप लाईन असते. या स्टॉप लाईनच्या अलीकडेच वाहने थांबली तर दुसऱ्या बाजूची वाहने सहजच ‘पास’ होतात; परंतु आजघडीला एकाही सिग्नलवर ही स्टॉप लाईन अस्तित्वात राहिलेली नाही. वाहनचालक सिग्नल लागल्यानंतर इतके पुढे येऊन थांबतात की, सिग्नल सुटलेल्या बाजूच्या वाहनांना रस्ताच ओलांडता येत नाही. त्यामुळे प्रत्येक चौकात सातत्याने वाहतुकीचा खोळंबा होताना दिसतो. रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसाने ‘अरे, गाडी मागे थांबव ना’ असे म्हटले तर वाहनचालक ‘अहो, गाडी कोठे थांबवायची, यासाठी स्टॉप लाईन टाका ना’ असे उत्तर देत असल्याचे काही वाहतूक पोलिसांनी सांगितले.
जालना रोडचा गळा घोटला
जालना रोड म्हणजे शहराच्या वाहतुकीची ‘लाईफ लाईन’च. शहरातील ७० टक्के नागरिक दिवसातून एकदा तरी या रस्त्याचा वापर करतातच. रेकॉर्डवर जालना रोड हा नगरनाक्यापासून क्रांतीचौकपर्यंत चौपदरी आहे. तर क्रांतीचौक ते अमरप्रीत सहापदरी, अमरप्रीत ते मोंढानाका चारपदरी आणि मोंढा ते सिडको बसस्थानकापर्यंत सहापदरी आहे. मात्र, आजघडीला हा रस्ता कोठेच रेकॉर्डप्रमाणे राहिलेला दिसून येत नाही.
दुभाजक लाईनही गायब
रस्त्यावर वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी रस्त्यावर दुभाजकाच्या बाजूलाच पांढऱ्या दुभाजक लाईनही असाव्यात, असा एक नियम आहे. वाहने एका रांगेत जावीत, यासाठी या लाईन असतात. मात्र, शहरातील एकाही रस्त्यावर दुभाजक लाईन दिसून येत नाहीत. परिणामी रस्त्यावरून वाहने वेडीवाकडी धावताना दिसून येतात. त्यामुळेही वाहतुकीचा वेग मंदावलेला दिसून येतो.
झेब्रा काँसिंगचा अभाव
पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग असणे गरजेचे असते; परंतु आजघडीला शहरातील कोणत्याही रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग दिसून येत नाही.
विशेष म्हणजे सिग्नलच्या ठिकाणीही झेब्रा क्रॉसिंग आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नलमध्ये तशी व्यवस्था केलेली नाही. परिणामी पादचारी जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडताना दिसून येतात.
पार्किंग लाईनच नाही
पार्किंगवर तोडगा म्हणून अनेक शहरांमध्ये मनपाच्या वतीने रस्त्याच्या कडेला वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, अशा पार्किंग लाईन बनविण्यात आलेल्या आहेत. औरंगाबादेत सेव्हन हिल ते गजानन मंदिर रोडवर असा प्रयोग काही दिवसांपूर्वी मनपाच्या वतीने करण्यात आला होता.