दारिद्र्य रेषेखालील ‘सुकन्या’ लाभापासून वंचित !
By Admin | Published: May 20, 2014 12:16 AM2014-05-20T00:16:46+5:302014-05-20T01:11:10+5:30
रविंद्र भताने, चापोली १ जानेवारी २०१४ पासून महाराष्टÑ शासनाने दारिद्र्यरेषेखालील जन्मलेल्या मुलींसाठी कल्याणकारी व मुलींसाठी ‘संजीवनी’ ठरेल अशी सुकन्या योजना
रविंद्र भताने, चापोली १ जानेवारी २०१४ पासून महाराष्टÑ शासनाने दारिद्र्यरेषेखालील जन्मलेल्या मुलींसाठी कल्याणकारी व मुलींसाठी ‘संजीवनी’ ठरेल अशी सुकन्या योजना अंमलात आणली आहे. मात्र चापोलीसह चाकूर तालुक्यात ही योजना अंमलात आलीच नाही, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील जन्मलेल्या ‘सुकन्या’ ह्या ‘सुकन्या’ योजनेपासून वंचित राहतील की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुलींचे शिक्षण व आरोग्य सुधारणा करणे, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रूणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलाइतका मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने राज्यात ‘सुकन्या योजना’ शासनाने सुरू केली आहे. मुलीचा जन्म झाल्यावर परिसरातील अंगणवाडी सेविका/मुख्य सेविका यांनी त्याची नोंद घ्यावी व अर्जासह ही माहिती बालविकास प्रकल्पाधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे द्यावी व या विभागामार्फत ती माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे देण्याचे स्पष्ट निर्देश या योजनेत आहेत. मात्र योजना सुरू होऊन ४ महिने उलटले तरीही एकही नोंद अद्याप करण्यात आलेली नाही. अंगणवाडी सेविकांना या योजनेची माहितीही नाही. शासनाने मुलींसाठी ‘संजीवनी’ ठरणारी अशी ‘सुकन्या’ योजना सुरू केली आहे. मात्र केवळ या योजनेची जनजागृती न केल्यामुळे आज दारिद्र्यरेषेखालील अनेक ‘सुकन्या’ ह्या योजनेपासून वंचित राहत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे योजना अंमलात आणण्यात अडचणी आल्या. मात्र आता सर्वांना त्यांच्या परिसरातील दारिद्र्यरेषेखालील जन्मलेल्या मुलींच्या नोंदी घेण्याचे निर्देश देऊ व एकही मुलगी या योजनेपासून वंचित राहणार नाहीत, असे मत प्रभारी गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण यांनी व्यक्त केले. अशी आहे ‘सुकन्या’ योजना... मुलीच्या नावाने राज्य सरकार विमा काढणार आहे. त्यासाठी २१ हजार २०० रुपये एकावेळी जमा केले जाणार आहे. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर तिला १ लाख रुपये मिळतील. त्यापूर्वी तिचा मृत्यू किंवा विवाह झाल्यावर सर्व रक्कम शासनाच्या खात्यावर जमा होणार आहे. ९ वी ते १२ वीपर्यंत ६०० रुपये शिष्यवृत्ती सहा महिन्याप्रमाणे दिली जाईल. १०० रुपये शुल्क भरून मुलीच्या पित्याच्या नावेही विमा काढण्यात येणार आहे. पालकांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३० हजार, अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार. अपघातात दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी झाल्यास ७५ हजार, अपघातात एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास ३७ हजार ५०० रुपये मिळणार आहेत.