औषधवैद्यकशास्त्र विभागातील अपघात विभागात स्वच्छतागृहाचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:02 AM2021-05-08T04:02:26+5:302021-05-08T04:02:26+5:30
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या इमारतीत अपघात विभाग पालकमंत्र्यांच्या हस्ते सुरु करण्यात आला. मात्र, इथे स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने ...
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या इमारतीत अपघात विभाग पालकमंत्र्यांच्या हस्ते सुरु करण्यात आला. मात्र, इथे स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने रुग्णांना डायपरचा वापर करावा लागतो तर येथील कोरोना रुग्णसेवेतील कर्मचारी, डाॅक्टर, परिचारिकांना इतर वाॅर्डांतील स्वच्छतागृहामध्ये जावे लागत असल्याने असुविधेला सामोरे जावे लागत आहे.
मेडिसीन इमारतीत १५ जानेवारीला पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अपघात विभाग रुग्ण सुविधेसाठी सुरु करण्यात आला. प्रत्यक्षात १२ व्हेंटिलेटर बेड आणि १६ बेड अशी २८ बेडची व्यवस्था असलेला सुसज्ज अपघात विभाग महिनाभरापूर्वी सुरु करण्यात आला. इथे डाॅक्टर, परिचारिका, कर्मचारी, रुग्णांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. इथे चार ते पाच तासांपेक्षा अधिक काळ वाॅर्डात जागा उपलब्ध होईपर्यंत रुग्णांना थांबावे लागते. स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने रुग्णांना डायपर लावावे लागतात. नातेवाईकांना डायपरचा भुर्दंड नाहक सोसावा लागत आहे. तर इथे एका शिफ्टमध्ये कार्यरत सुमारे १० डॉक्टर, कर्मचारी, परिचारिकांना इतर वाॅर्डात जाऊन स्वच्छतागृहाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे इथे स्वच्छतागृहाची व्यवस्था असावी अशी मागणी कर्मचारी, नातेवाईकांतून होत आहे.
-
कॅज्युअल्टीत स्वच्छतागृह अपेक्षित नाही. मेडिसीन इमारतीत आतमध्ये स्वच्छतागृह बांधण्याचा विचार होता. मात्र, तिथे योग्य जागा नाही. भविष्यातही हा अपघात विभाग सुरु ठेवण्याचा विचार आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर स्वच्छतागृहाची उभारणी करु.
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय