लढेंगे जितेंगे हम सब जरांगे! महाशांतता रॅलीसाठी मराठा बांधव छत्रपती संभाजीनगरात एकवटले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 01:16 PM2024-07-13T13:16:39+5:302024-07-13T13:22:27+5:30
छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय असा जयघोष करीत आहेत.
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या महाशांतता रॅलीसाठी शहरातील सिडको चौकात बांधव एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे. महाशांतता रॅलीसाठी आलेले मराठा बांधव' लढेंगे जितेंगे, हम सब जरांगे ,अशा घोषणा देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय असा जयघोष करीत आहेत.
सकल मराठा समाजाच्यावतीने जरांगे यांच्या या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सिडकोतील वसंतराव नाईक चाैक ते क्रांती चौक अशी ही रॅली जाईल. यासाठी सकाळपासून मराठा बांधव सिडको चौकात जमत आहेत. रॅलीच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी आरोग्य तपासणी, अन्नदान आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच आंदोलक विविध माध्यमातून रॅलीत सहभागी होताना दिसत आहेत. कोणाच्या माथ्यावर तर कोणाच्या हातावर 'एक मराठा,लाख मराठा' असे पेंटिंग्ज आहे. हातात जरांगे पाटील यांच्या प्रतिमा घेऊन आंदोलक घोषणा देत सिडकोच्या चौकात जमत आहेत.रॅलीत महिला आणि तरुणांचा सहभाग मोठा आहे. दरम्यान, सकाळी अकरा वाजता तब्बल ३६१ ट्रॅक्टरचा रॅलीत सहभाग असून सर्वांनी क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फेरी मारून अभिवादन केले.
दहा रुग्णालयांकडून मोफत आपत्कालीन सेवा
जरांगे यांच्या महाशांतता रॅलीदरम्यान सहभागी समाजबांधवांपैकी कोणाची प्रकृती अचानक खालावल्यास रॅली मार्गालगतच्या दहा रुग्णालयांमार्फत मोफत आपत्कालीन सेवा देण्याचा निर्णय संत तुकाराम मेडिकल फाऊंडेशनने घेतला. यासाठी रुग्णालयांची यादीही फाऊंडेशनने जाहीर केली आहे.
सुमारे ५०० स्वयंसेवक सज्ज
१३ जुलै २०१६ रोजी नगर जिल्ह्यातील कोपर्डीत मराठा समाजातील मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यातील पहिला मराठा क्रांती मूक मोर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये ९ ऑगस्ट २०१६ रोजी काढण्यात आला होता. या घटनेला ८ वर्षे होत असताना शनिवारी जरांगे यांची महाशांतता रॅली होत आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या रॅलीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाज येणार आहे. शिस्तबद्ध रॅलीचे दर्शन घडविण्यासाठी समाजातील सुमारे ५०० स्वयंसेवक सज्ज आहेत.
बाहेरील तालुक्यातून येणाऱ्यांसाठी पार्किंग व्यवस्था
१.जालना, करमाडकडून येणाऱ्या वाहनांसाठी - रामनगर कमानीसमोर ग्रॅमफोर्थ समोरील पार्किंग.
२.सिल्लोड, फुलंब्रीकडून येणाऱ्या वाहनांसाठी - शरद टी सिग्नलजवळील खुले मैदान.
आंबेडकर चौक पिसादेवी रोडवरील राममंदिर ट्रस्ट मैदान, मिलिनियम पार्क मैदान.
३. कन्नड, वैजापूर, नगर रोडकडून येणाऱ्या वाहनांसाठी - आयकर भवनजवळील फुटबॉल मैदान, कर्णपुरा पार्किंग.
४. पाचोड, आडोळकडून येणाऱ्या वाहनांसाठी - जबिंदा मैदान.
५. बिडकीन, पैठणकडून येणाऱ्या वाहनांसाठी - अयोध्या मैदान.
छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या सकाळी ९ वाजेपासूनच केंब्रिज चौक ते नगर नाका, कोकणवाडी चौक ते सिल्लेखाना रस्ता पूर्णपणे बंद राहणार #maharareservation#chhatrapatisambhajinagarpic.twitter.com/PRN0O5FeEx
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) July 12, 2024
पहिल्यांदाच जालना रोड बंद
पहिल्यांदाच शहराची मुख्य वाहिनी समजला जाणारा जालना रोड केंब्रिज चौक ते नगर नाकापर्यंत सकाळी ११ वाजेपासून बंद करण्यात आला आहे. केंब्रिज चौक ते नगर नाका १४.८ किमीचा रस्ता रॅली संपेपर्यंत बंद असेल. त्यासोबतच क्रांती चौकाला जोडणारा कोकणवाडी चौक ते सिल्लेखाना चौक या मार्गावर देखील सर्व प्रकारची वाहतूक बंद असेल. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
हे पर्यायी मार्ग वापरा:
-केंब्रिज चौक, झाल्टा फाटा ते बीड बायपास मार्गे महानुभव आश्रम चौक या मार्गे जातील व येतील.
-केंब्रिज चौक ते सावंगी बायपास, हर्सुल टी, हडको कॉर्नर, अण्णा भाऊ साठे चौक, सिटी क्लब, मिलकॉर्नर, महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप)
-नगर नाका, लोखंडी पूल, पंचवटी, रेल्वेस्थानक मार्गे महानुभव चौक.
-कोकणवाडी चाैक, पंचवटी चौक, महावीर चौक मार्गे पुढे जातील व येतील.
२४ ठिकाणी ब्लॉकिंग पॉइंट, त्यामुळे जालना रोडवर वाहनांना बंदीच
जालना रोडवर जोडले जाणारे महत्त्वाचे २४ चौक बॅरिकेडब्लॉक केले जातील. यात प्रामुख्याने केंब्रिज चौक, मुकुंदवाडी येथील एसटी वर्कशॉप, एपीआय कॉर्नर, सिडको चौकातील कामगार चौक व जळगाव रोडकडे जाणारे मार्ग, हायकोर्ट चौक, कॅनॉटकडून रामगिरीकडे येणारा मार्ग, एअर इंडियाचे कार्यालय, मनियार दुकानाजवळील चौक (एमजीएम), गजानन महाराज मंदिरापासून जालना रोडच्या दिशेने चौक बंद केला जाईल, ॲपेक्स रुग्णालय मार्ग, त्रिमूर्ती चौक, लक्ष्मण चावडी, अजबनगर, बंजारा कॉलनी, सावजी रुग्णालय, सिल्लेखाना, उस्मानपुरा चौक, काल्डा कॉर्नर, कोकणवाडी, जिल्हा न्यायालय चौक, रमानगर, महावीर चौक बॅरिकेड्स लावून बंद केले जातील.